Pune Crime News | ‘आपली ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी’ मित्रांना मेसेज करुन तरुणाने कपाळावर मधोमध गोळी झाडून केली आत्महत्या
पुणे : Pune Crime News | लग्न होत नाही आणि प्रेम करत असलेल्या तरुणीने दुसर्याबरोबर लग्न केल्याच्या निराशेतून तरुणाने मित्रांना :आता ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी,” असा मेसेज करुन स्वत:च्या कपाळावर मधोमध गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अक्षय कालिदास कांबळे (वय २६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना खराडीमधील तुळजाभवानी नगरमधील हॉटेल गौरव रेसिडेन्सी येथे २९ ऑक्टोंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मिरा लक्ष्मण चव्हाण यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांबळे हा कोरेगाव भीमा येथील स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होता. तो २७ ऑक्टोबर रोजी खराडी येथील हॉटेल गौरव रेसिडेन्सी येथील तिसर्या मजल्यावरील खोलीमध्ये मुक्कामाला होता. २९ ऑक्टोंबर रोजी दुपारपर्यंत त्याने खोली न उघडल्याने त्यांनी खोली उघडून पाहिले तर अक्षय कांबळे याच्या हातात पिस्टल होते व तो खाली पडलेला होता. रिसेप्शनिस्ट जितेंद्र पाडी याने खराडी पोलीस ठाण्यात येऊन हे सांगितले. त्याबरोबर पोलीस हॉटेलमध्ये पोहचले. अक्षय कांबळे याने दोन्ही हाताने पिस्टल पकडलेले व उजव्या हाताचा अंगठा पिस्टलच्या एक्स्ट्रॅक्टरवर अडकलेला दिसून आले. त्याचे वडिल व भाऊ विशाल कालिदास कांबळे यांनी अक्षय कांबळे याला ओळखले. त्याला सरळकरुन पाहिले असता त्याचे कपाळावर मधोमध गोळी मारुन घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
अक्षय कांबळे याचा विवाह होत नव्हता तसेच त्याचे प्रेम असलेल्या तरुणीने दुसर्याबरोबर विवाह केल्याचे सांगितले जाते. त्या निराशेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. त्याने आत्महत्या करण्यावरुन आपल्या मित्रांना शेवटचा मेसेज केला होता. त्यात त्याने “आपली ही शेवटची भेट, त्यानंतर पुढच्या जन्मी आता भेटू,” अशा आशयाचा मेसेज केला होता.
अक्षय कांबळे याच्याकडे हे विनापरवाना पिस्टल कोठून आले. त्याच्या आत्महत्यामागील नेमके कारण काय याचा सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.
