Pune Crime News । पाय बांधून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तरुणाचा निर्घुण खुन; मांजरी खुर्द येथील घटना
पुणे : Pune Crime News । तरुणाचे दोरीने दोन्ही पाय बांधून त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तरुणाचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मांजरी खुर्द येथील व्ही टी पी व गेरा कन्स्ट्रक्शन साईट या दोन्हीचे मधोमध नदी किनार्याजवळ हा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार दीपक बाळु कोकरे (वय ३०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता उघडकीस आला आहे.
वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, व्हि टी पी व गेरा कन्स्ट्रक्शन या दोन साईटच्या मध्ये झाडी झुडपी असून त्यामध्ये एकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. एका ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाचा हा मृतदेह आहे. त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. त्याच्या डोक्यात सिपोरेक्स ब्लॉकने मारुन त्याचा खुन करण्यात आला आहे. या तरुणाच्या अंगात फिकट गुलाबी फुल शर्ट असून त्यावर यश डिझायनर शर्ट YASH DESIGNER SHIRT असे इंग्रजीमध्ये लिहले आहे. निळ्या रंगाचे जॅकेट असून त्यावर निकी NIKY चा लोगो आहे़ निळ्या रंगाची पॅन्ट असून त्यावर बाय युग युथ BY YOUNG YOUTH असे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे. काळ्या रंगाचा बेल्ट, विटकरी रंगाची पायात चप्पल असून जवळ आकाशी रंगाचे वायरलेस हेडफोन घातलेले होते.
मारेकर्यांना त्याचा खुन करुन मृतदेह नदीपात्रात टाकून देण्याचा प्लॅन असावा, असे दिसून येते. परंतु, त्यांना ते न जमल्याने त्यांनी नदी किनार्याजवळील झुडपात हा मृतदेह टाकून दिला असावा, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. जवळपासच्या सर्व पोलीस ठाण्यात शोध घेण्यात आला असून कोठेही तरुणाच्या बेपत्ताची नोंद झालेली नाही. वाघोली पोलीस तपास करीत आहेत.
