Pune NCP (SP) Rally | बेरोजगार हक्कांसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तिरंगा टू-व्हीलर रॅली; तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune NCP (SP) Rally | राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटीची प्रकरणे, परीक्षांमधील गैरप्रकार आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पुण्यात ‘बेरोजगार हक्क एल्गार तिरंगा टू-व्हीलर रॅली’ काढण्यात आली. शिवाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आणि पश्चिम विभागाचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्या आयोजनातून ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि बेरोजगारी, पेपरफुटी तसेच पारदर्शक परीक्षा व्यवस्थेच्या मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे महानगरपालिकेतील गटनेते काका चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
‘पेपरफुटीनंतर आता रोजगाराचा प्रश्न गंभीर’
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी परीक्षांमधील गैरप्रकार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. काही महिन्यांपूर्वी NEET परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. या परीक्षेला देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. मात्र, पेपरफुटीचा प्रश्न संपलेला नसून आता त्यासोबत रोजगाराचा प्रश्नही तरुणांसमोर उभा राहिला आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
‘चाकणमधील उद्योग बाहेर जाऊ नयेत’
पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीतील सुमारे 20 उद्योजक बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला. हे उद्योग बाहेर गेल्यास चाकण परिसरातील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे या उद्योगांना महाराष्ट्रातच टिकवून ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
“उद्योजक बाहेर जाता कामा नयेत. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच सध्या उपलब्ध असलेले रोजगार टिकविणेही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तरुणाईला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
‘तरुणांच्या शिक्षणावरील विश्वासाला तडा जाऊ नये’
रॅलीचे आयोजक श्रीकांत पाटील यांनी देशात आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप केला. व्यापार आणि उद्योग क्षेत्रासमोरही विविध अडचणी निर्माण झाल्या असून, देशाचे भविष्य असलेल्या तरुणांसमोर रोजगार आणि विश्वासार्ह शिक्षणव्यवस्थेचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करतात. त्यांच्या शिक्षणासाठी पालक कष्टाची कमाई खर्च करतात. मात्र परीक्षा प्रक्रियेत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा अनियमितता झाल्यास विद्यार्थ्यांची संपूर्ण मेहनत वाया जाते, असे पाटील म्हणाले.
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या प्रकरणामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी सरकार आणि प्रशासनाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन केले असताना काही ठिकाणी पोलिसांकडून बळाचा वापर झाल्याच्या घटना समोर आल्याचा आरोपही श्रीकांत पाटील यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठविणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद साधला पाहिजे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तरुणांना दर्जेदार शिक्षण, रोजगाराच्या पुरेशा संधी आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कोणत्याही परीक्षेतील गैरप्रकारामुळे त्यांच्या भवितव्याशी खेळ होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
‘पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर आणि पारदर्शक यंत्रणा हवी’
पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर आणि पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणी रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली. परीक्षा केंद्रांपासून प्रश्नपत्रिका वितरणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असावी. तसेच गैरप्रकारात दोषी आढळणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची, संस्थेची किंवा पदाची असली तरी तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
“शिक्षण आमचा हक्क आहे, रोजगार आमचा हक्क आहे, पारदर्शक परीक्षा आमचा हक्क आहे आणि तरुणांच्या भवितव्याशी कोणालाही खेळू देणार नाही,” असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
सरकारने या रॅलीची दखल घेऊन विद्यार्थ्यांचे आणि बेरोजगार तरुणांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. अन्यथा भविष्यात या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा श्रीकांत पाटील यांनी दिला.
