Pune PMC News | तलाव आणि नदीतील पाणी प्रदूषणाच्या अपडेटस्साठी पालिका ‘एमपीसीबी’ वर अवलंबून; पाषाण तलावातील मासे मृत पावल्याच्या घटनेनंतर पर्यावरण विभागाकडील त्रुटी उघड

Pune PMC News

पुणे : Pune PMC News |  पाषाण तलावातील माश्यांचा मृत्यु पाण्यातील ऑक्सीजनची पातळी कमी झाल्याने प्राथमिक तपासात समोर आले आहे. पाण्यातील ऑक्सीजन पातळी कशामुळे कमी झाली याचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून आलेला नाही.  यानिमित्ताने शहरातील जलस्त्रोतांच्या प्रदुषणाची माहिती देणारी महापालिकेची यंत्रणाच सध्या अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे तसेच पर्यावरण विभागातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता देखिल समोर आली आहे. या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पाषाण, कात्रज, जांभुळवाडीसह नैसर्गिक नागझरी नाले आणि नदीपात्रातील पाणी प्रदूषणाची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.instagram.com/p/DXJiqFPCZqo

पाषाण तलावात मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आल्याने खळबळ उडाली.  यानिमित्ताने पाषाण तलावालगत नव्याने विकसित केलेला एक एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प, या प्रकल्पात वरील बाजूने क्षमतेपेक्षा अधिकचे येणारे मैलापाणी, पाषाण तलावात मोठ्या प्रमाणावर असलेला गाळ आणि जलपर्णी तसेच ड्रेनेज विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आदी मुद्दे चर्चेत आले. महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी तडकाफडकी चार अधिकार्‍यांना निवंबीत करून वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे.  याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर  चौकशी करत आहेत.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार पाषाण तलावातील मासे पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने मृत पावल्याचे समोर आले आहे.  यानिमित्ताने पाषाण , कात्रज, जांभुळवाडी तलावासह शहरातील प्रमुख नाले आणि नदीपात्रातील पाणी प्रदुषणाबाबत पर्यावरण विभागाची भूमिका चर्चेत आली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा अधिकार दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे.  पर्यावरण विभागामध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण अधिकार्‍याचा पदभार  हा राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील शिक्षण अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने शहरातील वरिल जलस्त्रोतांतील पाण्याची प्रत्येक महिन्याला तपासणी करण्यात येते. तर काही वर्षांपुर्वीपर्यंत पालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने दर पंधरा दिवसांनी तपासणीचे काम करण्यात येत होते. या पाणी तपासणीचा अहवाल संबधित विभागांना तातडीने कळविण्यात येत होता.यामुळे संबधित विभाग अलर्ट होउन योग्य ती काळजी घेत होते.  यासंदर्भाने पर्यावरण विभागासह ड्रेनेज, विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून पर्यावरण विभागाच्या प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍याकडून असे कोणते अहवाल येतात याची माहिती नसल्याचे सांगितले. केवळ दर महिन्याला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येणार्‍या अहवालावरच आम्ही अवलंबून असतो, असे स्पष्ट केले.

यासोबतच पाषाण तलावातील जलपर्णी काढण्याचे वर्षभराचे कंत्राट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलीच कशी? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाषाण तलावाच्या सुशोभीकरणासाठी तसेच देखभाल दुरूस्तीसाठी यापुर्वीही मोठ्याप्रमाणावर खर्च करण्यात आला असून यापुढेही नियोजन करण्यात आले आहे. राम नदीतून पाषाण तलावात येणारे मैलापाणी तलावाच्या बाजूने पाईपलाईन करून मुळा नदीलगतच्या एसटीपीपर्यंत नेण्याचे जायका प्रकल्पामध्ये नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात काही प्रमाणात कामही झाले असले तरी आजही मोठ्याप्रमाणावर पाणी पाषाण तलावात जात असल्याने  नियोजनाचा बोर्‍या वाजल्याचेही स्पष्ट होते.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या एसटीपी उभारण्यापुर्वीपासून पाषाण तलावात मोठ्या प्रमाणावर मैलापाणी येते. तलावात मोठ्या संख्येने मासे मृत पावल्याची घटना क्वचितच घडली आहे. पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सीजनचे प्रमाण कशामुळे कमी झाले याचा शोध घेण्यात येत आहे.

शहरातील पाषाण, कात्रज आणि जांभुळवाडी तलावातील पाण्याचे प्रदूषण तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासंदर्भाने तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.. रोजच्या रोज पाणी प्रदूषणाची माहिती ऑनलाईन मिळू शकणार आहे. मनुष्यबळ वाढवून मिळावे, तज्ञ अधिकारी मिळावेत यासाठी महापौरांशी देखिल चर्चा करण्यात आली आहे.

– गणेश सोनुने, किशोरी शिंदे (पर्यावरण अधिकारी)

You may have missed