Tejasvi Surya | महिला विधेयकाविरोधावरून महाविकास आघाडीवर टीका; महाराष्ट्राचे नुकसान होणार – खासदार तेजस्वी सूर्या
पुणे : Tejasvi Surya | महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगत खासदार तेजस्वी सूर्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. नारी शक्ती वंदन अधिनियम आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून काँग्रेससह विरोधकांनी महिलांच्या तसेच महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचा विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुणे शहर भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलताना सूर्या म्हणाले की, या विधेयकांमुळे महिलांना अधिक संधी मिळणार होत्या, तसेच राज्यांच्या प्रतिनिधित्वातही वाढ होणार होती. मात्र काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी विरोध केल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास महिलांच्या प्रगतीला अडथळा आणणारा राहिला आहे. हिंदू कोड बिलालाही काँग्रेसने विरोध केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.
परिसीमन विधेयकाच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारच्या सूत्रानुसार महाराष्ट्राला २४ अतिरिक्त लोकसभा जागा मिळू शकल्या असत्या. मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे राज्याच्या वाट्याला फारच कमी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिनिधित्वाला फटका बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर मतदारांनी विरोधकांना जाब विचारावा आणि योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
