PMC News | अखेर क्षेत्रिय कार्यालयांमार्फत प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांची स्वच्छता; मॅकेनिकल स्विपिंग बंद असल्याने झाली होती दुर्दशा

पुणे – PMC News | मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदा रद्द करण्यात आल्याने शहरातील बहुतांश भागातील रस्ते आणि उड्डाणपुलांवर कचर्याचे साम्राज्य पसरल्याच्या वृत्ताची घनकचरा विभागाने (PMC Solid Waste Management) दखल घेतली आहे. मागील दोन दिवसांत क्षेत्रिय कार्यालयांच्या सेवकांमार्फत हे रस्ते आणि उड्डाणपुल स्वच्छ करण्यात आले आहेत, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीतील मोठे रस्ते (Main Roads In Pune) आणि उड्डाणपुलांची स्वच्छता मॅकेनिकल स्विपिंगद्वारे केली जाते. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी ही स्वच्छता करण्यात येते. मात्र, हडपसर-वानवडी परिसर वगळता उर्वरीत शहरातील मॅकेनिकल स्विपिंगचे कंत्राट फेब्रुवारी महिन्यांत संपले आहे. प्रशासनाने मॅकेनिकल स्विपिंगसाठी निविदा काढल्या होत्या. परंतू या निविदा ३५ टक्क्यांहून अधिक दराने आल्याने त्या रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
दरम्यान मॅकेनिकल स्विपिंग होत नसल्याने शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांच्या कडेला आणि उड्डाणपुलांवर कचरा साठला. तसेच पावसाळ्यात वाहनांच्या टायरमुळे येणार्या मातीचे थर लागल्याने पुलावरून वाहने चालविणेही अवघड झाले होते. यासंदर्भातील वृत्त दोन दिवसांपुर्वी माध्यमांतून प्रसिद्ध झाले. याची दखल घेत घन कचरा विभागाने शहरातील सर्व क्षेत्रिय कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांची स्वच्छता करण्यास सांगितले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
आठ दिवसांनंतरही त्या ट्रकची माहिती नाही
बॉयलर पेटविण्यासाठी खाजगी कंपनीला कचर्यातील प्लास्टिक आणि चिंध्या पुरविणारा ट्रक दौंड तालुक्यातील देउळगाव गाडा येथील ग्रामस्थानी पकडून यवत पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याप्रकरणी संबधित ट्रक ताब्यात घेउन पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा देखिल दाखल केला आहे. हा ट्रक रामटेकडी येथील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून गेल्याचे ट्रक चालकाने पोलिसांना सांगितले. हा ट्रक नेमका कोणत्या प्रकल्पातून गेला याचा शोध अद्यापही घनकचरा विभागाला लागलेला नाही. यासंदर्भात बोलताना संदीप कदम यांनी सांगितले, की रामटेकडी, हांडेवाडी परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांना नोटीस पाठविल्या आहेत. त्यापैकी दोन प्रकल्प चालकांनी तो ट्रक त्यांच्या प्रकल्पांतून गेला नसल्याचे सांगितले. उर्वरीत प्रकल्पातून लवकरच माहिती मिळेल, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली आहे. (PMC News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा