Pune Crime News | बिलावरुन कॅबचालकाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; मीटरप्रमाणे पैसे घेतल्यावर झाला होता वाद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | अ‍ॅपवर ३५० रुपये झाले तर मीटर प्रमाणे ३८० रुपये झाले होते. कॅब चालकाने मीटरप्रमाणे पैसे घेतल्यावरुन प्रवाशांच्या दोघा नातेवाईकांनी हाता पायाने मारहाण करुन कॅबचालकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत कॅबचालक कुमार देवानंद गायकवाड (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, पिंपरी चिंचवड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कबीर रजनिकांत मुलतानी आणि युवराज म्हस्के यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील जिजामाता चौक येथे ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमार गायकवाड हे कॅब चालक आहेत. ते पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दोन महिला व एक पुरुष प्रवाशाला घेऊन वानवडीतील फातिमानगर येथून घेऊन आंबेगाव पठार येथे आले. तेव्हा अ‍ॅपवर ३५० रुपये बिल झाले होते. मीटरप्रमाणे ३८० रुपये झाले होते. त्यांनी ३८० रुपये सांगितले. त्यावर प्रवासी महिला हिने थांबा माझे पती येत आहे. त्यांनी ३८० रुपये दिल्याने कुमार गायकवाड हे कॅब घेऊन तेथून निघाले. काही अंतरावर गेल्यावर दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी कॅब थांबविण्यास सांगून आता तुम्हीच दोन महिला, एका पुरुषाला सोडवले का, असे विचारले. त्यावर त्यांनी हो म्हणाले़ तेव्हा त्यांनी कॅबची चावी काढून घेतली. त्यांना बाहेर काढून दोघांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. ते खाली पडल्यावर लाथाबुक्क्यांनी मारले. त्यावेळी एकाने बाजूला असलेला दगड उचलून कॅबचालकाच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले. कॅबचालकाने ११२ वर फोन केल्यावर पोलीस आले. त्यांनी कॅब चालकाला ससून रुग्णालयात नेले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुमित दळवी तपास करीत आहेत.

You may have missed