Mallikarjun Kharge In Pune | पंचसूत्री योजनांची अंमलबजावणी करण्याचे ‘डोके’ आमच्याकडे आहे; तुमच्याकडे ‘पन्नास खोके, सगळ्यांना’ ठोके असलेले भ्रष्टाचारी – मल्लिकार्जुन खरगे

Mallikarjun Kharge

डॉ. बाबासाहेबांचे संविधान जाळणार्‍या, तिरंग्यावरील अशोक चक्राला विरोध करणार्‍यांनी बलिदानाची परंपरा असलेल्या कॉंग्रेसला देशभक्ती शिकवू नये

पुणे : Mallikarjun Kharge In Pune | देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यात आणि नंतर एकात्मता टिकवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना जाळणारे, तिरंग्यावरील अशोक चक्राला विरोध करणारे आणि तिरंगा ध्वज स्वीकारण्यास नकार देणार्‍या भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवू नये. कॉंग्रेसने नरेेगा, शेतकर्‍यांचे ७२ हजार कोटी कर्जमाफी, अन्न सुरक्षासारख्या अनेक योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. कॉंग्रेसने जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे डोके आमच्याकडे आहे. तुमच्याकडे ‘पन्नास खोके, सगळ्यांना ठोके’ असलेले भ्रष्टाचारी भरलेले आहेत. अशा भ्रष्टाचारी सरकारला महिला, शेतकरी, युवकांनी खाली खेचावे आणि महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी आपले अमुल्य मत द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज येथे केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खरगे गुरूवारी येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला. खरगे म्हणाले, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो. शेतकर्‍यांच्या सोयाबीन, कापूस, कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काही बोलत नाही. पुर्वी पंतप्रधान राज्यातील निवडणुकांसाठी एखाद दुसरी सभा घेत. परंतू आता पंतप्रधान, गृहमंत्र्यांपासून भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. कॉंग्रेसला शिव्या देण्याचा त्यांचा एककल्ली कार्यक्रम सुरू आहे. कामगार संघटनांच्या निवडणुकांमध्ये देखिल जी भाषा वापरली जात नाही, त्या लेव्हलला जावून ही मंडळी प्रचारात जातीधर्मावर बोलत आहेत. महागाई गगनाला पोहोचलीय, बेरोजगारी वाढली आहे. यावर मात्र ते बोलत नाहीत.

पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नईला गुंतवणूकीस प्राधान्य देणार्‍या उद्योगांना गुजरातला पळविण्यात येत आहे. यानिमित्ताने फक्त उद्योगच नाही तर हजारो रोजगार यानिमित्ताने हिरावून घेतले जात आहेत. कॉंग्रेस काळात अनेक संस्थांना गांधी, नेहरू परिवारातील व्यक्तिंची नावे दिल्याचा आरोप करताहेत. पण स्वत:च जिवंतपणी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून स्वत:चे नाव देतात हे मात्र सोयीस्करपणे विसरतात.

पन्नास खोके एकदम ओके सरकारला कर्नाटक सरकार बोलण्याचा काय अधिकार?

पन्नास खोके एकदम ओके असा भ्रष्टाचार असलेले सरकार बनवणार्‍यांना आमच्या कर्नाटक वर बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्यावर एडी ची कारवाई करता त्यांना आपल्या पक्षात घेता आहात. अनेकजण आजही भीती पोटी तिकडे जात आहेत. त्यांना राज्यसभेवर घेताय. असे किती तरी कॉंग्रेस नेते त्यांनी सभेवर घेतले आहेत. केवळ सरकार बनवण्यासाठी अशा लोकांचा आधार घेता. ज्यावेळी शेजारचं घर जळत तेंव्हा त्याची धग तुमच्या घराला पण लागणार आहे, असा टोला खरगे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे पंतप्रधान

सत्तेच्या लोभापायी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) घाईगडबड करतात. सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आयोध्येतील राम मंदिराच्या छतातून पाणी ठिबकतय. उज्जैनमधील मंदिराच्या प्रांगणातील मुर्त्या हवेने कोसळल्या. संसदेच्या उदघाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंना देखिल न बोलवता सगळच स्वत:च उरकल. मोदी यांचा हात जिथ जिथ लागतो, तिथे असच होतय याला काय म्हणणार? ते दोन कोटी नोकर्‍या देउ म्हणाले होते, प्रत्येकाच्या खात्यात १५लाख टाकणार, नोटबंदिने भ्रष्टाचार बंद होईल, दहशतवाद संपेल, नक्षलवाद संपेल हे खोटं बोललात होते. गृहमंत्री अमित शहाच सांगतात हे जुमले होते. कॉंग्रेस कश्मिरमध्ये पुन्हा कलम ३७० आणणार असे सांगत आहेत. आम्ही हे कधी बोललो हे त्यांनी सांगाव. संसदेत निर्णय झाला आहे. त्यांचाच पक्ष कश्मिरमध्ये सत्तेच्या भागीदारीत आहे. एवढे खोटे बोलणारा देशाचा पंतप्रधान आतापर्यंत पाहीला नाही. त्यांच्या या जुमलेबाजीमुळे देशाचे काहीच भले होणार नाही.

अदानी, अंबांनीसाठी सरकार काम करत आहे

भाजपचे सरकार देशातील दोन लोकांवर दौलत जादा करत आहेत. देशातील पाच टक्के लोकांकडे ६५ टक्के संपत्ती आहे. तर
५० टक्के लोकांकडे ३ टक्के संपत्ती आहे. अदानीला दिलेल्या सरकारी बंदरांवर मोठ्याप्रमाणावर अंमली पदार्थ आयात केले जात आहेत. या ड्रग्जमुळे पुणे, मुंबई, बंगळूर, पंजाब, दिल्लीसारखी युवापिढी बरबाद होत आहे. सरकारी बंदरे आणि विमानतळांचे खाजगीकरण करून भाजप देश विघातक गोष्टींना पोसत असल्याचा हल्ला खरगे यांनी यावेळी मोदी सरकारवर केला.

महाराष्ट्र पूर्वीपासून पहिल्या क्रमांकावर

महाराष्ट्र पहिल्यापासून प्रगत राज्य आहे. येथील शहरे पहिल्यापासून उद्योगांना आकिर्षत करत आले आहे. कॉंग्रेसने सत्ता काळात अनेक योजनांची घोषणाच केली नाही तर त्यांची अंमलबजावणी देखिल केली. कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश राज्यात आम्ही जाहीर केलेल्या योजना उत्तमपणे सुरू आहेत. महाराष्ट्रासाठी आम्ही पंचसूत्री जाहीर केली आहे, तिची अंमलबजावणी करण्याचे डोके आमच्याकडे आहे. सोयाबीनला सात हजार हमीभाव, कापूस, कांद्याला हमीभाव देण्याबाबत आम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण करू, असा विश्‍वास देखिल मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी व्यक्त केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mallikarjun Kharge In Pune | महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य करू – मल्लिकार्जुन खरगे


You may have missed