Pune Crime News | फटाक्यावरुन चाक गेल्याच्या कारणावरुन मुलीच्या डोक्यात वार करुन खुनाचा प्रयत्न; समर्थ पोलिसांनी दोघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फटाक्यावरुन रिक्षाचे चाक गेल्याने झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चौघांनी रिक्षाचालकाला मारहाण करुन त्यांच्या मुलीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विनायक अतिश कांबळे Vinayak Atish Kamble (वय २६) आणि आर्यन विजय शिंदे Aryan Vijay Shinde (वय १८, दोघे रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या घटनेत आकांक्षा नितीन साळवे (वय २१, रा. पत्रा चाळ, न्यू नाना पेठ) हिच्या डोक्यात वार केल्याने ती जागेवरच बेशुद्ध पडली होती. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत तिचे वडील नितीन गिरधारी साळवे (वय ४२, रा. एसआरए बिल्डिंग, पत्रा चाळ, न्यू नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संदेश संजय जाधव (वय ३०, रा. पत्रा चाळ, न्यू नाना पेठ) व त्याच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नाना पेठेतील होप हॉस्पिटलजवळ पत्रा चाळ येथे ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे रिक्षाचालक आहेत. दिवाळीनिमित्त ते आपल्या नातेवाईकांना भेटून पत्नी व मुलीसह ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता रिक्षाने घरी परत येत होते. त्यावेळी त्यांच्या एस आर ए बिल्डिंगमध्ये राहणारे संजय ऊर्फ काळु जाधव (वय ५०) व त्यांचा जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे हे रोडवर फटाके वाजवत होते. उबाळे याच्या फटाक्यावरुन रिक्षाचे चाक गेल्याने त्याने नितीन साळवे यांना शिवीगाळ केली. त्यांनी फटाका दिसला नाही, असे सांगितले. त्यानंतर ५ ते १० मिनिटानंतर तो परत येऊन त्याने नितीन साळवे यांच्या अंगावर धावुन येऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी पत्नी आली असता तिला धक्का लागून ती खाली पडून तिच्या गुडघ्याला मार लागला. त्यावेळी त्यांनी वाद मिटवून ते घरी गेले होते.

त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नितीन साळवे हे घराजवळील होप हॉस्पिटल जवळ गेले होते. तेथे संजय जाधव यांचा मुलगा संदेश जाधव व त्याचे मित्र होते. त्यांना पाहून संजय जाधव त्याच्याबरोबरील तीन मित्रांना बोलला की, आपल्या दाजीसोबत फटाक्यावरुन याचेच भांडणे झाली होती, असे बोलून ते  नितीन साळवे यांच्याजवळ आले. संदेश जाधव दोघांनी त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना का मारत आहे, असे विचारत असताना ते ‘‘तुला लय माज आला आहे,’’असे बोलत होते. त्याचे भांडण पाहून ते सोडविण्यासाठी त्यांची पत्नी व दोन्ही मुली, भाचा निकुल अशोक जगताप हे तिथे येऊन मारहाण करणार्‍यांना सोडवत होते. तेव्हा संदेश जाधव याच्याबरोबर विनायक कांबळे याने त्याच्याकडील धारदार हत्यार घेऊन तुला लय माज आला आहे, आज तुला खल्लासच करुन टाकतो, असे बोलून त्याच्याकडील हत्याराने नितीन यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची मुलगी आकांक्षा ही मध्ये आली असता तिच्या डोक्यात कोयत्याचा वार लागून ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून जास्त प्रमाणात रक्त आल्याने ती बेशुद्ध पडली. हे पाहून भांडणे करणारे संदेश जाधव व त्याचे साथीदार पळून गेले. नितीन साळवे यांनी आकांक्षा हिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी संदेश जाधव याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

दरम्यान, विनायक आतिश कांबळे (वय २६, रा. लुंबिनीनगर, ताडीवाला रोड) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन नितीन गिरधारी साळवे व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ऋषी उबाळे याच्याबरोबर फटाक्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून विनायक कांबळे व आर्यन शिंदे यांना लोखंडी हत्याराने मारुन डाव्या हातास दुखापत केली. तसेच विनायक कांबळे यांच्या तोंडावर हाताने बुक्कीने मारुन गंभीर दुखापत केली आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

You may have missed