Pune Crime News | अटकेची भीती दाखवुन ज्येष्ठ महिलेची 32 लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | नाशिक येथील एका बँकेची दोन कोटींची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कर्वेनगरमध्ये राहत असलेल्या ७५ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेबर दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर ६ ऑक्टोंबर रोजी सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डाचा वापर करुन नाशिक येथील कॅनरा बँकेकडून चुकीचा वापर करुन दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केलेले पैसे तुमच्या बँक खात्यावर पाठवलेले आहेत. तुम्ही आम्हाला परत करा, नाही तर तुमच्या विरोधात पकड वॉरंट काढले जाईल. तुम्हाला अटक करुन तुमची सर्व मालमत्ता फ्रिज केली जाईल, असे धमकाविले. त्यांना डिजिटल अॅरेस्ट करण्याची धमकी दिली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस सुविधेचा वापर करुन वेळोवेळी ३२ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. महिलेने चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत.
