Pune Crime News | ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास जादा परतावाचे आमिष दाखवून 18 लाखांची फसवणुक करणार्यास पिंपरी पोलिसांनी केली अटक
पिंपरी : Pune Crime News | वन वर्ल्ड टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची १८ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करणार्यास पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
जयेश शिवराज चौधरी Jayesh Shivraj Chaudhary (वय ४०, रा. विजय प्लाझा, रेंटेड कॉटर्स, साई चौक, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका महिलेने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिंपरीतील शगुन चौकातील जवाहर लाईटस या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात २०१७ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश चौधरी याचे पिंपरीमध्ये वन वर्ल्ड टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय आहे. त्याने फिर्यादी यांना या व्यवसायामध्ये २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला ६० ते ७० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना २५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. २५ लाख रुपये गुंतविल्यानंतर जयेश चौधरी याने सुरुवातीला त्यांना ६ लाख ६२ हजार २४१ रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर त्याने परतावा देणे बंद केले. त्यांची मुळ मुद्दल १८ लाख ३५ हजार ७५९ रुपये परत केले नाही़ तसेच परतावा दिला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलीस उपनिरीक्षक दलालवाड यांनी सांगितले की, या महिलेच्या फिर्यादी नुसार पोलिसांनी जयेश चौधरी याला अटक केली आहे. सध्या तरी या एका महिलेची फिर्याद आली आहे. जयेश चौधरी याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास करीत आहोत. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
