DyCM Sunetra Pawar | महायुतीत नवे समीकरण? सुनेत्रा पवारांकडे अर्थखाते देण्याबाबत हालचाली वेगात

Sunetra Pawar

मुंबई : DyCM Sunetra Pawar | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार यांच्याकडील अनेक खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती; मात्र राज्याचे महत्त्वाचे मानले जाणारे अर्थ व नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरते स्वतःकडे ठेवले होते. आता हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

यासंदर्भात अलीकडेच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यावर प्राथमिक सहमती झाल्याची चर्चा असून, पुढील काही महिन्यांत खाते हस्तांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महायुतीतील सत्तासंतुलनातही बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

दिवंगत अजित पवार यांनी राज्याचे तब्बल अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करत वित्त विभागावर मजबूत पकड ठेवली होती. त्यांच्या निधनानंतर हे खाते कोणाकडे द्यायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. सुनेत्रा पवार राजकारणात तुलनेने नवख्या असल्याने तातडीने अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी येऊ नये म्हणून सुरुवातीला हे खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांच्याकडेच हे खाते देऊन अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

या संभाव्य निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक बळकट होण्याची शक्यता असून, महायुतीतील आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed