Pune Crime News | खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुंबईतील आरोपी पुण्यात येऊन करतोय गांजाची तस्करी; गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने दोघांना पकडून 34 किलो गांजासह 14 लाखांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | संशयास्पदरित्या कारसह थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये ३४ किलो गांजा आढळून आला. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने १४ लाख ८३ हजार रुपयांचा गांजा व कार जप्त केली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मुंबईतून पुण्यात येऊन अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे आढळून आले.
अक्षय पोपटराव पाडळे Akshay Popatrao Padle (वय ३१, रा. नविन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर) आणि विशाल दत्तात्रय जाधव Vishal Dattatreya Jadhav (वय २८, रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कदमवाक वस्तीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कृपासिंधु ईस्ट सोसायटीच्या समोर दोघे जण कारसह थांबलेले आढळून आले. पोलिसांना पाहिल्यावर त्यांचे हावभाव बदलले. तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. त्यांच्याजवळील कारची झडती घेतली. तेव्हा कारमध्ये ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा आढळून आला.
अक्षय पाडुळे याच्यावर गेल्या वर्षी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अक्षय पाडळे हा फरार झाला होता. दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन डी पी एस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार नासीर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे, राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे यांनी केली आहे.
