Mumbai-Pune Missing Link | 1 मेपासून ‘मिसिंग लिंक’ सुरू; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास होणार जलद, ज्वलनशील वाहनांना बंदी
पुणे : Mumbai-Pune Missing Link | मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेला बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई‑पुणे एक्सप्रेसवेवरील हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने खंडाळा घाटातील अवघड वळणांचा त्रास कमी होणार असून, प्रवासाचा वेळ साधारण २० ते २५ मिनिटांनी घटणार आहे.
या नव्या मार्गात बोगदे, उड्डाणपूल आणि सरळ रेषेतील रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातील धोकादायक वळणे टाळता येणार आहेत आणि अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळणार आहे.
मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने काही वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्वलनशील पदार्थ, रसायने किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या टँकर आणि मोठ्या मालवाहू वाहनांना ‘मिसिंग लिंक’वरून प्रवेश दिला जाणार नाही. अशा वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फत करण्यात आली आहे. ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुसूत्र होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
