Smart Ration Card | स्मार्ट रेशन कार्ड योजना लागू; 4.23 लाख लाभार्थ्यांना मिळणार डिजिटल शिधापत्रिका
पुणे : Smart Ration Card | सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी पुण्यात लवकरच स्मार्ट रेशन कार्ड योजना राबवली जाणार आहे. पारंपरिक कागदी रेशनकार्डांमुळे डुप्लिकेट नोंदी, खोटी माहिती आणि गैरवापराच्या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने डिजिटल प्रणालीकडे मोठे पाऊल टाकले आहे.
या नव्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एटीएम कार्डसारखे दिसणारे मजबूत पीव्हीसी स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डवर क्यूआर कोड आणि ई-स्वाक्षरी असणार असून रेशन दुकानात कार्ड स्कॅन करून तसेच बायोमेट्रिक पडताळणीद्वारे लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली जाईल. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक नोंदी करणे किंवा बोगस लाभ घेणे अशा प्रकारांना प्रभावीपणे रोखता येणार आहे.
चिंचवड (अ), पिंपरी (ज) आणि भोसरी (क) या परिमंडळांत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार असून सुमारे ४.२३ लाख लाभार्थी आणि २६० रेशन दुकाने या योजनेत सहभागी होणार आहेत. स्मार्ट रेशन कार्डमुळे वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल होणार असून रेशन व्यवस्थेतील पारदर्शकतेला मोठे बळ मिळणार आहे.
