Pune PMC News | स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड
पुणे : Pune PMC News | पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा उमेदवारीं अर्ज एक मिनिट उशिरा दाखल झाल्याचे कारण देत निवडणूक अधिकारी एस आर ए चे आयुक्त सतीशकुमार खडके यांनी अवैध ठरविल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समिती मध्ये भाजपचे संख्याबळ १२ इतके असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक केवळ औपचारिक होती. भाजपने श्रीनाथ भिमाले यांना तर तीन सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुहास टिंगरे यांना उमेदवारी दिलीं होती.
एस आर ए चे आयुक्त सतीशकुमार खडके यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीला सुरुवात होताच टिंगरे यांनी नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे एक मिनिट उशिरा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तो अवैध ठरवला. यावर राष्ट्रवादीचे सदस्य माजी महापौर वैशाली बनकर, काँग्रेसचे सदस्य माजी महापौर प्रशांत जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी टिंगरे नगर सचिव कार्यालयात उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवू नये अशी मागणी केली. परंतु खडके हे टिंगरे यांचा अर्ज अवैध असल्याची भुमिका कायम ठेवत भीमाले यांची बिनविरोध निवड करत असल्याचे जाहीर केले. महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह सर्व स्थायी समिती अध्यक्षांनी भिमाले यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर अनुपस्थित
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल बालवडकर हे अनुपस्थित होते.
