Bapu Pathare MLA | लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे 8 दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन – आमदार बापूसाहेब पठारे

Bapu Pathare MLA | Start the work of main roads in Lohegaon within 8 days; otherwise protest in front of the Superintending Engineer's Office of the Public Works Department - MLA Bapusaheb Pathare

लोहगाव : Bapu Pathare MLA |  लोहगावमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे पुढील आठ दिवसांत प्रत्यक्ष सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिला आहे.

यासंदर्भात आमदार पठारे यांनी अधीक्षक अभियंता श्री. भरतकुमार बाविस्कर यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोहगावमधील डी. वाय. पाटील रस्ता, लोहगाव–निरगुडी रस्ता, लोहगाव–वाघोली ते काळभोर वस्ती रस्ता, माळवाडी रस्ता, पठारे वस्ती रस्ता तसेच पवार वस्ती रस्ता ही कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका तसेच पाच वेळा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही.

सदर रस्त्यांवर ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या लाईनची कामे पूर्ण होण्यापूर्वीच अनियोजनबद्ध पद्धतीने रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर कामे पूर्ण करण्यात आली असली, तरीही रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

वारंवार पाठपुरावा करूनही विभागाकडून विविध कारणे देत कामास विलंब केला जात आहे. संबंधित ठेकेदाराकडूनही कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.

यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून खराब रस्ते, उडणारी धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येत्या काही दिवसांत लोहगावची यात्रा होणार असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुढील आठ दिवसांत कामे प्रत्यक्ष सुरू करावीत; अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिला आहे.

You may have missed