Pune Crime News | वडिल, भावाकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव करुन 2 लाखांची खंडणी मागणार्‍या युवकाला अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News । वडिल, भावाकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव करुन २ लाखांची खंडणी मागणार्‍या युवकाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे.

मनिषकुमार जमनाप्रसाद द्विवेदी ManishKumar JamnaPrasad Dwivedi (वय २१, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे या युवकाचे नाव आहे. मनिषकुमार हा १२ वीमध्ये नापास झाल्यानंतर पुण्यात येऊन बाणेर येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे. मनिषकुमार हा ९ फेब्रुवारी रोजी गावी येणार होता. त्याचदिवशी त्याने गावी येत असल्याचे फोन करुन सांगितले होते.

मात्र रात्री त्याचा फोन बंद लागत होता. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मनिषकुमार याच्या मोबाईलवरुन त्याचे वडिलांना व फिर्यादी भावाला व्हॉटसअ‍ॅप मेसेज मिळाला. त्यात ‘‘यदी आप अपने बेटे को जिंदा देखना चाहते हो तो तुम्हारे पास छ: घंटे है, २ लाख रुपयोंका इंतजाम करलो/ पोलीस को बताने की कोशीश भी की तो वह मारा जायेगा/क्यु रे तुम्हे वह नही चाहीये, अगर छ: घंटेमे पैसे नही मिले तो हम भाई को मार देंगे’’ असा धमकीचा मेसेज मिळाला. भावाच्या जीवाला धोका असल्याचे वाटल्याने त्याच्या भावाने येथे येऊन बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली.

बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या निर्देशाप्रमाणे विशेष पथक गठीत केले. आरोपीचे व अपहरित व्यक्तीची सतत तांत्रिक माहिती काढण्यास पथकातील अधिकारी व अंमलदारांना सुचना दिल्या. मनिषकुमार द्विवेदी हा घटनास्थळापासून तो कधी व कोठे गेला, कोणत्या वाहनाने गेला, याबाबतची माहिती गोळा करण्यात आली. त्यात मनिषकुमार द्विवेदी हा एकटाच रिक्षाने शहरात फिरत होता, असे आढळून आले. तसेच म्हाळुंगे येथील एका सोसायटीमध्ये तो ९, १० व १२ फेब्रुवारीला एकटाच बरेच वेळा त्याच्या मित्राकडे आल्या गेल्याचे आढळून आले.

त्याबाबत मिळालेल्या माहितीवरुन त्याचे अपहरण खंडणीकरीता झालेले नसावे, असे त्याच्या वर्तनावरुन व हावभावावरुन दिसून येत होते. मनिषकुमार हा नंतर अहमदाबाद येथे गेल्याचे तसेच तेथून तो प्रयागराज येथे गेल्याचे तपास पथकाला आढळून आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलीस अंमलदार बाबासाहेब अहेर, किसन शिंगे हे प्रयागराज येथे गेले. त्यांनी प्रयागराज येथे माहिती काढली असता मनिषकुमार हा १२ वीचे राहिलेले पेपर देण्यासाठी दुसर्‍या गावात गेल्याचे समजले. त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्याला पुणे येथे आणण्यास सांगितले.

दरम्यान, त्याच्या भावाने मनिषकुमार याच्या अकाऊंटवर १० हजार रुपये पाठविले होते.

मनिषकुमार २३ फेब्रुवारी रोजी पुण्यात आल्यावर त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचे वडिलांकडून व भावाकडून पैसे मिळावे, या उद्देशाने हे कृत्य केल्याचे सांगितले. युवकाने स्वत:चे अपहरणाचा बनाव करुन त्याचे खंडणीकरीता अपहरण झाले आहे, अशी खोटी व बनावट माहिती नातेवाईकांना देऊन त्यांच्याकडून खंडणीची अग्रीम रक्कम १० हजार रुपये ऑनलाईन प्राप्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चुलूमुला, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, शरद राऊत, गजानन अवतिरक, स्वप्नील मराठे यांनी केली आहे.

You may have missed