Karvenagar Cemetery News | कर्वेनगर स्मशानभूमीची दुरावस्था; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची संदीप खर्डेकर यांच्याकडून मागणी

Karvenagar Cemetery News | Karvenagar Cemetery in poor condition; Sandeep Khardekar demands immediate completion of pending works

पुणे : Karvenagar Cemetery News |  कर्वेनगर स्मशानभूमीतील दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत पुणे मनपाच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांना पत्र दिले आहे.

अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेल्यानंतर तेथील अत्यंत वाईट परिस्थिती निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. परिसरात खोदकाम सुरू असल्याने स्मशानात जाण्याचा रस्ता अरुंद व धोकादायक बनला आहे. तसेच पार्किंगची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कल्व्हर्टचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे काम अर्धवट अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ठिकठिकाणी साहित्य पडून अस्वच्छता निर्माण झाली असून, हे काम पूर्ण होणार की नाही, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात मनपाने तातडीने खुलासा करून काम पूर्ण होण्याची निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच बदलत्या काळानुसार सर्व स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नागरिकांनी त्याचा वापर करावा यासाठी जनजागृती फलक लावावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे.