Yerawada Jail News | येरवडा कारागृहात एकाचवेळी 5 मोबाईल, 2 पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडल्याने एकच खळबळ, कारागृहाकडून 1, 2 व 6 बराकची झडती

Yerawada Jail News | 5 mobiles, 2 power banks, charging wires found in Yerawada Jail at once, prison searches 1, 2 and 6 barracks

पुणे : Yerawada Jail News | येरवडा कारागृहाच्या सीमा भिंतीलगत मोबाईल फोन सापडल्यानंतर कारागृह पोलिसांनी १, २ व ६ बराकींमध्ये विशेष झडती मोहिम घेतली. त्यात कारागृह अधिकार्‍यांना तब्बल ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर आढळून आल्या़ने एकच खळबळ उडाली.

याबाबत सहायक तुरुंगाधिकारी सुनिल तुकाराम गायकवाड (वय ५५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कैदी नौशाद बदुद्रीन शेख व इतर कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच व २२ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते साडेआठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहायक तुरुंगाधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना सर्कलच्या आवारात संचारफेरी करत होते. त्यावेळी बाह्य शौचालयाच्या पाठीमागील बाजूला एक बंदी संशयास्पदरित्या हालचाल करत असल्याचे त्यांनी पाहिले. ते त्या ठिकाणी गेल्यावर नौशाद बदुद्रीन शेख याने जमिनीवर पडलेला मोबाईल फोन त्यांच्या हातात दिला. त्याने शेख याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन तो निघून गेला. फिर्यादी यांनी वरिष्ठांना याचा अहवाल दिला. त्यांनी कारागृह उपमहानिरीक्षक यांची विशेष झडती मोहिमेसाठी परवानगी घेतली. या परवानगीनुसार २२ फेब्रुवारी रोजी त्यांनी ४ ते साडेसहा वाजेच्या दरम्यान ही विशेष झडती मोहिम हाती घेण्यात आली.

बराक क्रमांक १ मधील शिक्षा बंदी नौशाद शेख याच्या बराकचे बाहेरील बाजूस असलेल्या बॅगेची झडती घेतली. त्यात हिरो कंपनीचा मोबाईल, विना बॅटरी व सीमकार्ड, चार्जिंग वायर मिळून आली. त्यानंतर बराक क्रमांक १, २, ६ बराकचे बाहेरील परिसराची कसून झडती घेण्यात आली.

बराक एकच्या बाहेर नोकीया कंपनीचा विना बॅटरी व सीमकार्ड असलेला ३ मोबाईल, बराक क्रमांक ६ च्या बाहेरील बाजूला विना बॅटरी, सीमकार्ड नसलेला एक मोबाईल फोन, दोन पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडल्या.

कारागृहात परवानगी नसताना मोबाईल फोन, पॉवर बँक, चार्जिंग वायर आणल्याबद्दल नौशाद शेख व इतर कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करीत आहेत.

You may have missed