Prime Minister Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्ससह जागतिक विक्रम
नवी दिल्ली : Prime Minister Narendra Modi | भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाच्या इतिहासात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर १०० मिलियन म्हणजे १० कोटी फॉलोअर्सचा आकडा पार झाला आहे. हा आकडा फक्त लोकप्रियतेचा नाही, तर डिजिटल माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधण्याच्या त्यांच्या क्षमतेचा देखील पुरावा आहे.
मोदींनी २०१४ मध्ये इन्स्टाग्रामवर खाते सुरू केले आणि गेल्या काही वर्षांत हे खाते अधिकृत कार्यक्रम, सरकारी उपक्रम, परदेश दौरे, सामाजिक उपक्रम आणि वैयक्तिक क्षण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. त्यांच्या पोस्टवर नागरिकांची सक्रिय प्रतिक्रिया, लाईक, कमेंट्स आणि शेअर्स दिसतात, ज्यामुळे मोदींचा डिजिटल प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.
जागतिक स्तरावर पाहता, मोदींच्या फॉलोअर्स संख्येने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्र्म्प यांपेक्षा दुपटीने अधिक आहे. ट्रम्प यांचे सुमारे ४३.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच इतर प्रमुख जागतिक नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षा मोदींच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे, ज्यामुळे ते जागतिक डिजिटल पटलावर अग्रगण्य नेते म्हणून ओळखले जात आहेत.
भारतामध्येही मोदींचा डिजिटल पोहोच इतर नेत्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांचे सुमारे १६.१ दशलक्ष फॉलोअर्स असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सुमारे १२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, पण मोदींच्या आकड्याच्या तुलनेत हे खूप कमी आहेत.
या विक्रमामुळे नरेंद्र मोदींची जागतिक डिजिटल उपस्थिती, सोशल मिडियावरील प्रभाव, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि लोकप्रियता यांचा ठोस पुरावा मिळतो. या टप्प्यामुळे ते सोशल मिडियावर सर्वाधिक प्रभावी राजकीय नेते म्हणून ओळखले जात आहेत आणि त्यांच्या डिजिटल धोरणांचा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.
