Pune Crime News | पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणेची पुर्नरावृत्ती ! हुंड्यापायी नवविवाहितेने इमारतीवरुन उडी मारुन जीवन संपविले; बाणेरमधील घटना, आयटी तरुणासह कुटुंबावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करुन तिला आपले जीव संपविण्यास भाग पाडल्याने पुण्यात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्याचीच पुर्नरावृत्ती बाणेरमध्ये घडली आहे. सासरकडील लोकांची हाव त्यांना साखरपुड्यामध्ये अनुभवाला आली होती. तरीही परदेशात उच्च शिक्षित, आयटी इंजिनिअर जावई मिळतोय असे वाटल्याने कलबुर्गी येथील एका प्राध्यापकाने आपली जमीन विकून मुलीचा थाटामाटात विवाह लावून दिला. पण, हुंड्यासाठी सासरी तिचा इतका छळ झाला की लग्नानंतर ३ महिन्यातच तिने इमारतीवरुन उडी मारुन आपले जीवन संपवले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत्यु पावलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याबाबत तिचे वडिल शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तेजस शिवा बेंबळकर Tejas Shiva Bemblkar (वय ३१) उज्ज्वला शिवा बेंबळकर Ujjwala Shiva Bembalkar (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर Shiva Manikrao Bembalkar (वय ६२), रिया शिवा बेंबळकर Riya Shiva Bemblkar (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्राध्यापक आहेत. त्यांची मुलगी गंगा हिच्यासाठी तेजस बेंबळकर याचे स्थळ सुचविण्यात आले. ते मुळचे परभणीचे राहणारे. तेजस याचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून तो पुण्यात आय टी इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करतो. १७ मे २०२५ रोजी कलबुर्गी येथे गंगा हिच्या पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी शिवा बेंबळकर व तेजस बेंबळकर म्हणाले की, गंगा ही सुंदर तसेच उच्चशिक्षित असून आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला लग्नात काही नको, असे बोलून साखरपुड्याची तारीख ठरवली.


१५ जून २०२५ रोजी वाकडमधील इसेन्सिया प्रिमियर हॉलमध्ये गंगा व तेजस यांचा साखरपुडा झाला. प्राध्यापकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार २० आहेर नेले होते. त्यात कपडे, चांदीचे ताट, चांदीचा नंदी असा आहेर होता. हा आहेर पाहून तेजसची आई उज्ज्वला बेंबळकर म्हणाली की, पाहुण्यांमध्ये आमची इज्जत काढून असला भिकारी फालतु आहेर आणला आहे का. आम्ही तुम्हाला भिकारी दिसत आहोत का, आमचे कुटुंब हे प्रतिष्ठित असून आमचे पाहुणे हे उच्च वर्गातील असून त्यांच्या समोर तुम्ही असला आहेर आणला का, असे बोलू लागल्या. सर्वांसमोर प्राध्यापक कुटुंबाचा अपमान केला.


तेजसचे वडिल लग्नामध्ये आम्हाला तुमच्याकडून काही एक नको, फक्त आम्हाला कन्यादान करा, असे बोलले होते. परंतु त्यानंतर ते त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा सांगू लागले. लग्नामध्ये आमचे प्रतिष्ठीत पाहुणे येणार आहेत, चांगले हॉटेल, मंगलकार्यालय हवे, अशी मागणी केली. कलबुर्गीमध्ये येऊन त्यांनी प्रतिष्ठीत व महागडे मंगल कार्यालय व हॉटेल पाहिले, नाहीतर आम्ही लग्नासाठी येणार नाही, असे बोलल्यावर प्राध्यापकांच्या मनाला धक्का बसला. पण मुलगी गंगा हिच्या सुखासाठी त्यांनी मन मारुन आपला प्लॉट विकून १ लाख ८० हजार रुपये भरुन मंगल कार्यालय बुक केले. १३ नोव्हेबर २०२५ रोजी विवाह ठरला. लग्नासाठी बेंबळकर कुटुंबियांकडून १६० पाहुणे आले होते. मंगल कार्यालयात आल्यावर त्यांना मंगल कार्यालय पसंत पडले नाही. पुन्हा त्यांना घालून पाडून बोलायला लागले. या ठिकाणी पाहुण्यांना कोणतीही देशी विदेशी दारु, वाईनची सोय नाही, असल्या फालतु ठिकाणी आम्ही राहु शकत नाही, असे बोलून अपमान केला. तेव्हा त्यांची वेगवेगळ्या हॉटेल व अपार्टमेंटमध्ये सोय केली़.

नवरदेव मुलगा यास केवळ चांगल्या कंपनीची अंडरवियर व बनियन आणले नाही, म्हणून लग्नामध्ये मुहर्तावर आले नाही. लग्नानंतर आठवड्याभराने धार्मिक विधीसाठी मुलगी व जावई कलबुर्गीला आले. तेव्हा गंगा हिने तिला घालून पाडुन बोलतात, तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला आमच्या मनासारखा हुंडा दिला नाही़ तसेच आमच्या मनासारखे लग्न केले नाही. आता तुझ्या माहेरुन २१ तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी करत आहे. त्यांनी मुलीची समजूत काढून तिला परत सासरी पाठविले. नंतर सोलापूरमध्ये एका लग्नाला ५ फेब्रुवारी रोजी गंगा तिच्या वडिलांना भेटली. तेव्हा तिने आपल्याला हुंड्यावरुन त्रास देत असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही पुढील महिन्यात येऊन भेटतो,असे सांगितले. पण, त्यानंतर भेटायला यायची वेळ आली नाही.

सासरी होणार्‍या छळाला कंटाळून १९ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीवरुन उडी मारुन गंगा हिने आपले जीवन संपविले. हे समजल्यानंतर तिची मोठी बहिण सुमा हिचा बांध फुटला. गंगा हिने तिची मैत्रीण सौम्या हिला फोनवर आपल्याला होणार्‍या त्रासाची माहिती दिली होती. तिचा पती तेजस हिला म्हणत होता की, मला तू माझ्या मनासारखी नसून माझ्या मैत्रिणी ह्या तुझ्यापेक्षा हॉट व सेक्सी दिसत असून तु फार गब्बु दिसत आहे. त्यांच्या तुलनेत मला तुझ्यात आनंद येत नाही. मी यु के ला शिक्षण घेतले असून माझ्या तुलनेत तुझे शिक्षण फालतु आहे. तु मला पसंत नव्हती़ तरीही देखील मी तुझ्यासोबत लग्न केले़ तुझा जगुन काही उपयोग नाही.

तसेच तेजसची बहिण रिया, सासु उज्ज्वला, सासरे शिवा हे गंगा बोलत होते की, तुझ्या सोबत लग्न करुन आम्हाला काहीच मिळाले नाही. तसेच गंगाचा पती तेजस हा गंगाला वैवाहिक सुख ही देत नव्हता. तसेच तिच्यापासून अंतर ठेवून राहत होता. तसेच गंगाची नणंद रिया ही देखील गंगाला हिणवत होती की, तू गावठी आहेस, तसेच तुला फॅशन सेन्स माहिती नाही, तुझ्यापेक्षा तेजसच्या मैत्रिणी फार अ‍ॅडव्हान्स आहेत. तु माझ्या भावाला शोभत नाही, असे गंगाने आम्हाला फोनवर सांगितले. तसेच गंगा हिने आम्हाला शपथ घालून ते तिच्या वडिलांना न सांगण्यासाठी सांगितले होते. गंगा हिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आता त्यांनी फिर्याद दिली आहे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

You may have missed