Pune Crime News | धुलवडीच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळून 5 जण जखमी ! Royal Palms येथे विना परवाना कार्यक्रम आयोजित करणार्या इव्हेंट मॅनेजरसह हॉटेल मालक, मॅनेजरवर गुन्हा दाखल (Video)
पुणे : Pune Crime News | मुंढवा येथील रॉयल पाम ( Royal Palms Koregaon Park) या हॉटेलमध्ये विनापरवाना धुलवडीचा कार्यक्रम आयोजित केला असून स्टेज कोसळून झालेल्या अपघातात ५ तरुण जखमी झाले. मुंढवा पोलिसांनी इव्हेंट आयोजकासह हॉटेल मालक, मॅनेजर यांच्यासह चौघांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेत पार्थ श्रीराम पवार (वय १९, रा. यशवंत सोसायटी, वारजे माळवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीच्या मणक्यास गंभीर दुखापत झाली आहे. अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले आहे. पार्थ पवार यांच्या फिर्यादीवरुन शुभम मुकेश घोष Shubham Mukesh Ghosh (वय ४०, रा. हडपसर) या इव्हेंट आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंढवा येथील एबीसी रोडवरील रॉयल पाम या हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इव्हेंट आयोजक शुभम घोष व त्याच्या साथीदारांनी विना परवाना रॉयल पाम हॉटेलमध्ये कलर कल्चर हा धुलीवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सुमारे एक ते दीड हजार तरुण तरुणी जमले होते. कार्यक्रमासाठी लोखंडी स्ट्रेक्चर उभारण्यात आले होते. दुपारी दीड वाजण्यासुमारास कार्यक्रम सुरु असता हे लोखंडी स्ट्रेक्चर खाली कोसळले. ते पार्थ पवार व इतरांचा अंगावर पडले. अचानक स्ट्रेक्चर अंगावर पडल्याने त्यात पार्थ पवार याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले.
विनापरवाना कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश राऊत यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हॉटेलचे मालक प्राणेश पवन पवार Pranesh Pawan Pawar (वय ३०, रा. ब्ल्यु स्प्रिंग सोसायटी, टेल्को कॉलनी, आंबेगाव), हॉटेल मॅनेजर स्वप्निल अरविंद उस्तरवार Swapnil Arvind Ustarwar (वय ३०, रा. रामचंद्र निवास, गाढवे कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) आणि इव्हेंट कंपनीचे सौरभ दीपक जाधव Saurabh Deepak Jadhav (वय २७, रा. साईधाम सोसायटी, धानोरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आयोजक व हॉटेल चालकांनी कोणतीही परवानगी न घेता मोठ्या आवाजात साऊंड/डीजे चालू ठेवून परिसरातील रहिवासी व जनतेला त्रास होईल, अशा प्रकारे मोठ्याने साऊंडचा आवाज करुन सार्वजनिक उपद्रव केला आहे. तसेच या इव्हेंटसाठी कोणतीही पूर्व परवानगी न घेता कायदेशीर आदेशाची अवज्ञा केल्याने ध्वनी प्रदुषणासह पर्यावर संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, स्मीता वसावे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करीत आहेत.
