Pune Crime News | उत्तर प्रदेशातील सनी गँगचे चोरटे विमानाने पुण्यात येऊन करत होते घरफोडी; विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक करुन 62 लाखांचे दागिने केले जप्त
पुणे : Pune Crime News | शहराच्या मध्यवस्तीमध्ये घरफोडी करणार्या चोरट्यांचा तपास लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. उत्तर प्रदेशातील रेकॉर्डवरील हे गुन्हेगार सनी गँगशी संबंधित असून ते विमानाने दिल्लीहून पुण्यात येऊन घरफोडी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आले असून त्यातील ६२ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आकाश सुभाष (वय २३, रा. सुंदरनगरी, दिल्ली, मुळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि जितेंद्र चर्तुवेदी (वय ३२, रा. सुंदरनगरी, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घराचा दरवाजा तोडून चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पुणे शहरातील संशयित आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलीस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांनी पाहिले असता त्यांना या चोरट्यांनी पुण्यात इतरत्रही चोर्या केल्याचे दिसून आले. पोलीस या चोरट्यांचा मागोवा घेत पुणे रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत पोहचले. तेथील एका लॉजवर ते राहिले होते. तेथून परराज्यात निघून गेल्याचे समजले.
परराज्यात चोरटे गेले असल्याने त्यांचा शोध घेणे खूप अवघड होते. परंतु, आशिष खरात व अनिस शेख यांनी परिसरात सतत वेशांतर करुन संशयित आरोपींवर पाळत ठेवली होती. त्यांना एक महिन्यांनंतर पुन्हा घरफोडी करण्यासाठी पुण्यात आले असून ते ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबले असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. या बातमीवरुन पोलिसांनी त्यांना चारही बाजुनी घेऊन २३ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दोन दिवसांपूर्वी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशनजवळील लॉजवर ठेवल्याचे सांगितले. लॉजवर जाऊन रुमची झडती घेतली. त्यात ३२ तोळे सोने व १२५ ग्रॅम चांदी मिळून आली. न्यायालयाने या आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर,पोलीस अंमलदार अशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड हे आरोपींना घेऊन दिल्ली व उत्तर प्रदेश येथे तपासासाठी गेले. तपासात आकाश सुभाष हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो सनी गँगशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. आकाश सुभाष याच्यावर उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये २०१८ पासून २ खुन, खुनाचा प्रयत्नासह गँगस्टर अॅक्टखाली ४ गुन्हे दाखल आहेत़ त्यांनी पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्यातील २, विश्रामबाग, खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ४०६ ग्रॅम सोने, १९१ ग्रॅम चांदी, लॅपटॉप व २ मोबाईल असा ६२ लाख ८१० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.
