Pune Crime News | वेबसिरीज ‘तस्करी’ प्रमाणे तस्करी करण्याचा तस्करांचा डाव उधळला; विमानाच्या बाथरूममधून 75 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

Pune Crime News | Smugglers' plan to smuggle drugs like 'smuggling' foiled; Hydroponic cannabis worth Rs 75 lakh seized from plane bathroom

पुणे : Pune Crime News |  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मेहनती सीमा शुल्क अधिकारी व त्याचे सहकारी कुख्यात तस्करी टोळीचा सामना करुन त्याचे तस्करीचे प्रयत्न हाणून पाडतात. इम्रान हश्मी, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘तस्करी / द स्मगलर्स वेब’ही वेबसिरीज नुकतीच गाजली होती. नेटफ्लिक्सवर ती टॉपवर आहे. याच वेबसिरीजमध्ये दाखविल्याप्रमाणे तस्करांनी अंमली पदार्थांची करण्याचा प्रयत्न केला. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने हा प्रयत्न हाणून पाडताना बँकॉकहून आलेल्या विमानाच्या बाथरुमध्ये लपवून ठेवलेला ७४ लाख ५० हजार रुपयांचा  हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुण्यात आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे (आयएक्स २४१) विमान पुढे देशांतर्गत सेवेसाठी वापरण्यात येणार होते. याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत तस्करांनी अमली पदार्थ लपवून ठेवण्याचा डाव आखला होता. विमानातील बाथरूममधील टिश्यू कॅबिनेटच्या फायबर भागाचे स्क्रू काढून त्यामागील पोकळीत दोन पिवळ्या रंगाची पाकिटे लपवण्यात आली होती.

विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे सखोल तपासणी केली. त्यावेळी बाथरूममधील लपवलेल्या जागेत दोन पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये व्हॅक्युम सीलबंद केलेली आठ लहान पाकिटे होती. त्यामध्ये उच्च प्रतीचा ७४५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा सापडला.

ही कारवाई मंगळवारी ३ मार्च रोजी पुणे सीमा शुल्क विभागच्या अधिकाऱ्यांनी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या अमली पदाथार्ची किंमत सुमारे ७४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

बँकॉकहून आलेले विमान पुढे देशांतर्गत विमान प्रवासासाठी वापरले जाते. परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी होते. परंतु, पुढे हेच विमान देशांतर्गत विमान प्रवास करत असेल तर त्यातील प्रवाशांची उतरल्यानंतर तपासणी होत नाही. याचा गैरफायदा घेऊन परदेशातून प्रवासी अंमली पदार्थ आणून विमानात दडवुन ठेवतात. विमान देशात आला की तो प्रवासी उतरुन जातो. नंतर त्याचा साथीदार या विमानातून प्रवास करताना लपविला अंमली पदार्थ ताब्यात घेऊन पुढे दुसर्‍या शहरात उतरतो.

‘तस्करी’ या वेबसिरीजमध्ये तस्कर तस्करीसाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे दाखवण्यात आले आहे. त्याच पद्धतीने बँकॉक-पुणे विमानात ड्रग तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने, तस्करांचा डाव फसला. अशा प्रकारे दुबईहून येणार्‍या विमानात सोने लपवून ठेवल्याचे यापूर्वी आढळून आले होते.

You may have missed