PMRDA News | येरवडा-कात्रज बोगदा प्रकल्पाचा आराखडा तयार; निधीअभावी काम प्रलंबित
पुणे : PMRDA News | पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या येरवडा ते कात्रज बोगदा प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा सुमारे २० किलोमीटर लांबीचा असणार आहे. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी सध्या अनिश्चिततेत आहे.
पीएमआरडीएच्या ४ हजार ५०३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देताना कात्रज ते येरवडा असा बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावरील चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याचा ट्विन टनेल पद्धतीने आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर ते दक्षिण पुणे जोडणारा महत्त्वाचा मार्ग उभारण्याची योजना होती. या बोगद्याचा अंदाजे खर्च प्रति किलोमीटर सुमारे ४०० कोटी रुपये इतका अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर पीएमआरडीएने या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. प्रस्तावित बोगद्यात एक मार्ग जाण्यासाठी आणि एक मार्ग परत येण्यासाठी ठेवण्याची योजना आहे.
वाहतुकीचा सुरळीत वापर व्हावा यासाठी बोगद्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश (एंट्री) आणि बाहेर पडण्याचे (एक्झिट) मार्ग ठेवण्याचा विचार आहे. मात्र त्या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त रस्ते लेन तयार करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
