Pune Crime News | शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खुन; तरुणाला गुन्हे शाखेच्या सुनिट 6 च्या पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | वडकी येथील काची कंपनीच्या शेजारील मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शेजारीच रक्ताने माखलेला दगड मिळून आला. या महिलेची ओळख पटली नसतानाही गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने महिलेचा खुन करणार्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. फिरस्ता असलेली व मानसिक रुग्ण असलेल्या या महिलेने शारीरीक संबंधांना प्रतिकार केल्याने रागाच्या भरात हमाली काम करणार्या तरुणाने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रकाश बिभिषण माने Prakash Vibhishan Mane (वय २९, रा. वडकी नाला, ता़ हवेली) असे खुन करणार्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी स्वत: फिर्याद दिली आहे. हडपसर सासवड रोडवरील आंबेकर लॉन्सच्या समोरील काची कंपनीच्या गोडावुन शेजारील मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती ३ मार्च रोजी सायंकाळी फुरसुंगी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिच्या शरीरावर कुर्ती शिवाय इतर कोणतेही वस्त्र नसल्याचे दिसून आले. तेथे जवळच रक्ताने माखलेला सिमेंटमिश्रीत दगड आढळून आला. तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. तिच्या कपाळावर गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झालेला दिसत होता. तिच्या मृत्युचे कारण राखुन ठेवण्यात आले असून व्हिसेरा परीक्षणाकरीता जतन करण्यात आला.
पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता ही महिला मानसिक रुग्ण होती. तिला दिवे घाट, वडकी परिसरात फिरताना २८ फेब्रुवारी रोजी दोघांनी पाहिल्याचे सांगितले. परंतु, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. फुरसुंगी पोलिसांनी ५ मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या गुन्ह्याचा गुन्हे शाखेतील पथके शोध घेत होती. पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यात एका फुटेजमध्ये संशयित दिसून आला. त्या आधारे पोलिसांनी प्रकाश माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रकाश माने हा हमाली काम करतो. १ मार्च रोजी रात्री त्याने या महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला. ही महिला मानसिक रुग्ण असली तरी तिने माने याच्या कृत्याला विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात माने याने तिचा गळा दाबला. ती निपचित पडलेली पाहिल्यावर तिच्या डोक्यात दगड घालून खुन केला.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की, ही महिला सासवड येथून दिवे घाटामार्गे वडकी परिसरात आली होती. तिचा शोध घेत आम्ही झेंडेवाडीपर्यंत पोहचलो आहे. तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे, अनिल जामगे, पल्लवी मोरे यांनी केली आहे.
