Old Pune Mumbai Highway | जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्या वाहनांवर ‘लेझर स्पीड कॅमेरे’ द्वारे करणार कारवाई ! विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहनांवरही होणार कारवाई
पुणे : Old Pune Mumbai Highway | पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतिवेग व त्यामुळे होणारे अपघात यामुळे येथे ठिकठिकाणी स्पीड कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यात यश आले. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते अपघातात मृत्यु होत असतात. या प्राणघातक अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळ व लोणावळा येथे अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहनांवरही कारवाई करणे शक्य होणार आहे.
ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिपचे वरिष्ठ रोड पोलिसिंग सल्लागार पॉल सिमकॉक्स यांच्या वतीने ट्रु कॅम स्पीड कॅमेरे (Tru cam ii speed camera) पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्याकडे एका कार्यक्रमात सुर्पूर्द करण्यात आले.
पुणे ग्रामीण रस्ते सुरक्षा अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण प्राणघातक अपघातापैकी ५७ टक्के अपघात पुणे ग्रामीण क्षेत्रात नोंदविण्यात आले आहे. २०२३ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात रस्ते अपघातात ९८३ जणांचा मृत्यु झाला होता. महामार्गावर होणारे बहुंताश अपघात वेग आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे घडतात. बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई, तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लेझर स्पीड कॅमेर्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा, वडगाव मावळ परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप या संस्थांकडून सहकार्य करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
लोणावळा, वडगाव मावळ परिसरात तीन ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे दिवसा आणि रात्री ही कार्यान्वित राहतात. कॅमेर्यांकडून वाहनांचा अचूक वेग नोंदविला जातो. महामार्गावरून जाणार्या वाहनांचा ३२० किलोमीटर प्रति तासापर्यंतचा वेग नोंदविण्याची क्षमता या उपकरणांमध्ये आहे, असे गिल यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचार्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भरधाव मोटार, ट्रक चालकांविरुद्ध कारवाईसाठी अशा प्रकारचे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.
वडगाव मावळ, लोणावळ्यात प्रायोगिक तत्वावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहे. हे कॅमेरे वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्या वाहनांचे छायाचित्र, तसेच चित्रीकरण करु शकतात, तसेच हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, वाहन चालविताना मोबाइलचा वापर अशा प्रकारचे नियमभंग करणार्यांविरुद्ध या कॅमेर्यांच्या माध्यमातून कारवाई करणे शक्य होणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.
