Pune Crime News | पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीला मारहाण करणे टेम्पोचालकाला पडले महागात; फरासखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन केली अटक
पुणे : Pune Crime News | किराणा दुकानदारात टेम्पोचालक तंबाखुची पुडी घेण्यासाठी आला होता. तर, डेली कलेक्शन करणारा कलेक्शनसाठी आला होता़ तू आधी घ्यायचे की मी यावरुन झालेल्या वादावादीचे भांडणात रुपांतर झाले. टेम्पोचालकाने डेली कलेक्शन करणार्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीला इलेक्ट्रिक वजनकाट्यावरील स्टीलची प्लेट उचलून डोक्यात मारली. गळ्यातील सोन्याची चैन हिसकावुन घेतली. फरासखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन टेम्पोचालकाला अटक केली आहे.
याबाबत योगेश रोहिदास खवले (वय ४२, रा. आनंदतारा आकांक्षा सोसायटी, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय शेखर सुर्वे Ajay Shekhar Surve (वय २८, रा. मंगळवार पेठ) यांना अटक केली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील धनलक्ष्मी सुपर मार्केट दुकानाबाहेर ७ मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश खवले हे वक्रतुंड पतसंस्था व सिद्धीविनायक फायनान्स या बँकेचे डेली कलेक्शनचे काम मंगळवार पेठ, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, सोमवार पेठ या भागात करतात. ते मंगळवार पेठेतील धनलक्ष्मी सुपर मार्केट या दुकानात कलेक्शनसाठी ७ मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता आले. दुकानाचे मालक महावीर सिंग सोलंकी यांच्याकडून कलेक्शनचे पैसे घेत असताना तेथे अजय सुर्वे हे आले. त्यांनी दुकानदाराकडे तंबाखुची पुडी मागितली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. अजय सुर्वे यांनी खवले यांना तुझी बॅगच गायब करतो, तुला कीडनॅप करतो, असे म्हणून त्याने हाताने मारहाण केली. दुकानाचे काऊंटरवर असलेल्या इलेक्ट्रिक वजन काट्यावरील स्टीलची प्लेट उचलून खवले यांच्या डोक्यात मारले. त्यांच्या गळ्यातील बालाजीचे पेन्डल असलेली ७० हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावुन घेतली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन त्यातून रक्त येऊ लागले. त्यावेळी आणखी दोन ते तीन जण आले.
त्यांनीही खवले यांना हाताने मारहाण केली. ते घाबरुन पोलीस चौकीच्या दिशेन पळून जात असताना इतरांनी त्यांचा पाठलाग करुन हातातील बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना औषधोपचारासाठी मेडिकल यादी दिली. त्यांनी पत्नीला बोलावून घेऊन ससून रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यास एक टाका पडल्याचे सांगितले. असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन टेम्पोचालक अजय सुर्वे यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तपास करीत आहेत.
