ACB Demand Case Pune | बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी मागितली 1 लाखांची लाच; फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी केली होती लाचेची मागणी
पुणे : ACB Demand Case Pune | फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाखांची लाच मागून तडजोडीअंती १ लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरुन बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
संदीप खेडकर PSI Sandeep Khedkar (रा. गंगा समृद्धी अपार्टमेंट, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ज्या तक्रार अर्जावरुन संदीप खेडकर हा लाच मागत होता, तो फसवणुकीचा तक्रार अर्ज फाईल करण्यात आला आहे.
याबाबत एका ४० वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर हे करत होते. या अर्जावरुन तक्रारदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी संदीप खेडकर याने २ लाख रुपयांची मागणी करीत होता. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळाली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३ फेब्रुवारी रोजीच लाच मागणीची पडताळणी केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर याने तक्रारदार यांचे विरुद्ध फसवणुकीसंदर्भात प्राप्त तक्रार अर्जामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पंचासमक्ष तसेच तक्रारदाराच्या वकिलासमक्ष तक्रारदाराकडे स्वत:करीता व वरिष्ठांसाठी तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही. तरीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने संदीप खेडकर याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांच्यावरही गुन्हा दाखल न होता तो तक्रार अर्ज फाईल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.
