Rajasthan News | राजस्थानात भीषण दुर्घटना; बांधकामस्थळी माती कोसळून सात कामगारांचा मृत्यू
राजस्थान : Rajasthan News | राजस्थानातील भिवाडी येथे बांधकामस्थळी माती कोसळून भीषण दुर्घटना घडली असून सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-जयपूर महामार्ग जवळील काप्रिवास परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात बेसमेंटसाठी खोदकामाचे काम सुरू असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला. त्या वेळी तेथे काम करत असलेले अनेक मजूर मातीखाली दबले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलिस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि मातीखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. या दुर्घटनेत सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून काही कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नेमकी ही दुर्घटना कशी घडली याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून सुरक्षा उपाययोजनांबाबतही तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
