Pune Crime News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून लक्ष्मीनगर पोलिसांनी जप्त केले पिस्तुल; बावरी कुटुंबातील वादातून बाळगले होते पिस्तुल
पुणे : Pune Crime News | येरवड्यातील पोते वस्तीमधील राहणार्या बावरी कुटुंबातील तरुणांमध्ये परस्पराविरुद्ध अनेक वाद आहेत. त्यातून त्यांनी एकमेकांवर गुन्हे ही दाखल केले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यातील वाद व्हायरल झाले होते. त्यातूनच पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पिस्तुल बाळगल्याची माहिती लक्ष्मीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला पकडून गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
सोनू सिंग दीपकसिंग बावरी Sonu Singh Deepak Singh Bawri (वय २२, रा. पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोते वस्तीमध्ये बावरी लोकांची अनेक कुटुंबे अनेक वर्षांपासून राहतात. वराहपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. आता तरुण मुले वेगवेगळ्या क्षेत्रात गेली असली तरी वराहपालनावरुन त्यांच्यात यापूर्वी अनेकदा भांडणे झाली आहेत. सोनू बावरी याच्यावरही गुन्हा दाखल आहे. त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकले होते. ते व्हायरल झाल्याने काही जण त्याचा शोध घेत होते.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व कादिर शेख यांना बातमीदाराने बातमी दिली की, डेक्कन कॉलेजच्या मैदानात एक जण थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार व त्यांच्या सहकार्यांनी डेक्कन कॉलेजच्या मैदानात जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे सोन बावरी याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चुलूमूला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, कादिर शेख, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अतुल जाधव, सुरज ओंबासे यांनी केली आहे.
