Pune Crime News | रिक्षा चोरी करुन त्यांना स्क्रॅप रिक्षांची नंबर प्लेट लावून वापरणार्या सराईत चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी केले जेरबंद; 6 रिक्षा केल्या जप्त, चोरीची रिक्षा चोरीला जाऊ नये, म्हणून लढविली अफलातून आयडिया
पुणे : Pune Crime News | रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना काळेपडळ पोलिसांनी १०२ सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा चोरट्याला पकडले. त्याच्याकडील चौकशीत त्याने रिक्षा चोरी करुन स्क्रॅप रिक्षांचे नंबर लावून त्या वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी ६ रिक्षा जप्त केल्या आहेत.
शादाब युसुफ अन्सारी Shadab Yusuf Ansari (वय २५, रा. सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे. चोरलेली रिक्षा दुसर्या कोणी चोरु नये, म्हणून शादाब अन्सारी याने अफलातून आयडिया वापरली होती. तो अडगळीच्या जागी रिक्षा उभी करत. तिची चाके काढून घेऊन जात असे. त्यामुळे चोरीची ही रिक्षा कोणी चोरुन नेत नसत.
याबाबत अखिल अमित चौधरी (वय ४२, रा. सय्यदनगर) यांनी तरवडे वस्तीतील इनामदार मैदान येथे आपली रिक्षा पार्क केली असता ती ७ व ८ मार्च च्या रात्री चोरीला गेली होती. या रिक्षाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांनी चोरी झालेल्या ठिकाणी एकूण १०२ सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे तपास केला. तेव्हा त्यांना उंड्रीतील पोखराई धरण येथे चोरीची रिक्षा झाडाखाली पार्क केलेली दिसून आली. पोलिसांनी तेथे सापळा रचून रिक्षा घेण्यासाठी आलेल्या शादाब अन्सारी याला पकडले.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे नंबर प्लेट चोरी करुन ते रिक्षांना लावून त्या रिक्षा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने विविध ठिकाणी अडगळीच्या जागेत ठेवलेल्या या रिक्षा जप्त केल्या.
काळेपडळ, चंदननगर, आंबेगाव, संत तुकारामनगर, वानवडी या पाच पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरलेल्या रिक्षा निष्पन्न झाल्या. आणखी एक रिक्षा कोठून चोरली, याचा शोध सुरु आहे.
शादाब अन्सारी हा या सर्व रिक्षा वापरत असे. १५ वर्षापेक्षा जास्त झालेल्या रिक्षा स्क्रॅप केल्या जातात. या स्क्रॅप केलेल्या रिक्षांची नंबर प्लेट शादाब अन्सारी चोरायचा. रिक्षा चोरली की, तिची नंबरप्लेट बदलुन तो तिला स्क्रॅप रिक्षाचा नंबर लावत असे. चोरलेली रिक्षा त्या भागात तो चालवत नसे. संत तुकारामनगर येथील रिक्षा तो आंबेगाव परिसरात चालवत असे. रात्री रिक्षा अडगळीत लावत. तिची चाके काढून घेऊन जात. त्यामुळे त्याची चोरीची रिक्षा कोणी चोरुन नेत नसे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या भागात चोरलेल्या रिक्षा ठेवल्या होत्या. त्या त्या भागात गेल्यावर तो ती रिक्षा दिवसभर चालवत असे. काळेपडळ पोलिसांनी १० लाख ७८ हजार रुपयांच्या या सर्व ६ रिक्षा जप्त केल्या आहेत.
