Pune Crime News | फॉर्च्यूनर गाडीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला जेरबंद करुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने 40 लाखांचा माल केला जप्त

Pune Crime News | Anti-narcotics squad arrests youth who came to sell ganja in Fortuner car, seizes goods worth Rs 40 lakhs

पुणे : Pune Crime News |  फॉर्च्यूनर गाडीतून गांजा विक्रीसाठी येणार्‍या तरुणाविषयी माहिती मिळाल्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून या गुन्हेगाराला पकडले. त्याच्याकडून ५३ किलो गांजासह ४० लाख ७० हजारांचा माल जप्त केला आहे.

प्रीतम रवींद्र कुंजीर Pritam Ravindra Kunjir (वय ३२, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढर्‍या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीतून गांजाचा मोठा साठा विक्री करण्यासाठी थेऊर येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १० मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून सापळा रचला. पहाटे ५ वाजेच्या सुमारास संशयास्पद फॉर्च्यूनर गाडी आली. पोलिसांनी गाडी थांबवुन प्रितम कुंजीर याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीतून १० लाख ६० हजार २८० रुपयांचा ५३ किलो १४ ग्रॅम गांजा, ३० लाखांची गाडी व मोबाईल असा ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिर्के, आशा भिंगारे, तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक पैठणे, पोलीस अंमलदार आण्णा माने, सुरज कुंभार व अशोक गिरी यांनी केली आहे.

You may have missed