Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, दोन दिवसांत पावसाची शक्यता

Rain

मुंबई : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. १२ मार्च रोजी राज्यातील काही भागांत तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत काही भागांत हवामानात बदल होण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांत तापमानासोबत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. कोकण किनारपट्टी भागात कमाल तापमान साधारण ३४ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाडा या भागांतही उन्हाचा जोर कायम असून नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि अमरावती या भागांत तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर या जिल्ह्यांतही उष्ण आणि कोरडे हवामान राहणार असून, तापमान ३८ ते ३९ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांत तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिकांनी शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ ते १४ मार्चदरम्यान मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या पावसामुळे सध्या जाणवणाऱ्या उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, हलके आणि सुती कपडे वापरणे तसेच दुपारच्या वेळी थेट उन्हात दीर्घकाळ राहणे टाळणे, अशा सूचना तज्ज्ञांकडून देण्यात आल्या आहेत. हवामानातील या बदलामुळे पुढील २४ ते ४८ तास राज्यातील वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

You may have missed