Pune Crime News | गावठी पिस्टल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद, गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : Pune Crime News | मित्राकडे पार्टीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून छत्रपती शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सिद्धार्थ अनिल बोराडे Siddharth Anil Borade (वय २०, रा. ज्ञानेश्वरनगर, तळेगाव दाभाडे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोयता घेऊन फिरत असल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाने छत्रपती शिवाजीनगर परिसरात सिद्धार्थ बोराडे याला दोन महिन्यांपूर्वी पकडले होते.
छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस अंमलदार दीपक चव्हाण व सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एक सराईत गुन्हेगार गावठी पिस्टल घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी बातमीची खात्री करुन रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. बुधवारी रात्री तेथे आलेल्या सिद्धार्थ बोराडे याला पोलिसांनी पकडले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे चौकशी केली असता मित्राकडे पार्टी करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस आयुक्त संतोष पाटील, पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, महावरी वलटे, राजकिरण पवार, तायडे व श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे.
