New Hajj House at Kharghar in Navi Mumbai | नवी मुंबईतील खारघर येथे होणार लवकरच नवीन हज हाऊस! भारतीय हज समिती आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागासोबत सामंजस्य करार
मुंबई : (हाजी बासित शेख) – New Hajj House at Kharghar in Navi Mumbai | भारतीय हज समितीने नवी मुंबईतील खारघर येथे २२५ कोटी रुपये खर्चुन हज यात्रेकरुंसाठी ट्रान्झिट कम ट्रेनिंग आणि सुविधा केंद्र म्हणून काम करणार्या नवीन हज हाऊस बांधण्याची घोषणा केली आहे.
या नवीन हज हाऊसच्या बांधकामासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्युडी) समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी हच कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहनवाज एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदाकत अली, नियाज अहमद व सीपीडब्ल्युडीचे अधिकारी उपस्थित होते.
हे ट्रान्झिट-कम-ट्रेनिंग आणि सुविधा केंद्र भारतीय यात्रेकरुंना हजसाठी मक्का येथे पवित्र प्रवास करण्यापूर्वी मदत करणारी एक आधुनिक एकात्मिक सुविधा केंद्र म्हणून काम करेल. या केंद्रातून प्रशिक्षण, मार्गदर्शन, निवास व्यवस्था आणि सुविधा सेवा प्रदान केल्या जातील, ज्यामुळे यात्रेकरूंना हज यात्रेसाठी चांगली तयारी करता येईल आणि त्यांचा प्रवासाचा अनुभव सुखद होईल.
महत्त्वाची बाब म्हणजे, प्रस्तावित हज हाऊसच्या जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ नुकतेच कार्यान्वित झाले असून हज यात्रेकरुंना आधीच चांगली संपर्क व्यवस्था आणि सोयीस्कर प्रवास व्यवस्था मिळेल. विमानतळाजवळील नवीन हज हाऊस हजसाठी जाणार्या यात्रेकरुंच्या एकूण सोयीसुविधेत लक्षणीय सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे.
हा उपक्रम हज यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण वचन पद्धतीचे प्रतीक आहे. तसेच हज यात्रेशी संबंधित व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्याच्या दिशेनेही हे महत्त्वाचे पाऊल आहे.
या प्रकल्पाला भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून २१ जानेवारी २०२६ रोजी तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित केंद्र सुमारे २२५ कोटी रुपये खर्चुन बांधले जाणार असून त्यासाठी भारतीय हज समिती निधी देणार आहे.
