Pune Crime News | प्रेमसंबंधाबाबत जाब विचारल्याने तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करुन केला खुन, संशयित आरोपी फरार

Pune Crime News | Young man beaten to death with wooden bat after being asked about love affair, suspect absconding

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंधाबाबत जाब विचारुन पुन्हा अल्पवयीन मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितल्याने तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी फरार झाला आहे.

विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. राधिका रॉयल सोसायटी, बारंगणीमळा, धायरी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ प्रथमेश प्रशांत हबीब (वय २६, रा. धायरी) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य उमाप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धायरीतील डीएसके रोडवरील दळवी वाडी फाट्याजवळ ११ मार्च रोजी रात्री दहा वाजता घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हबीब याचे सदाशिव पेठेतील बिजी लँड बिल्डिंगमध्ये ट्रेलरिंगचा व्यवसाय आहे. तो घरातून सकाळी १० वाजता निघून रात्री १० वाजता मोटारसायकलवरुन परत घरी येत असे. १५ दिवसांपूर्वी त्याच्या नातेवाईकांपैकी एकाचा फोन विशालला व त्याचे वडिल प्रशांत हबीब यांना आला होता. त्यांच्या १६ वर्षाच्या मुलीला आदित्य उमाप हा त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याला एकदा समजुन सांगा असे नातेवाईकाने सांगितल्याने विशाल याने त्यांच्याकडून आदित्यचा मोबाईल नंबर घेतला होता. आठवड्यापूर्वी विशाल याने आदित्य याला फोन करुन तु पुन्हा माझ्या नातेवाईकाच्या मुलीला  त्रास देऊ नको, असे सांगितले होते. त्यावेळी आदित्य व विशाल यांची फोनवर बाचाबाची झाली होती.

११ मार्च रोजी नेहमीप्रमाणे विशाल सकाळी कामाला गेला होता. रात्री दहा वाजून गेले तरी तो घरी न आल्याने त्याच्या आईने मोबाईलवर फोन केला. तेव्हा तो मोबाईल एका पोलिसांनी उचलला, हा नंबर कोणाचा आहे़ तुमच्या मुलाला अपघात झाला असून त्याला सिंहगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणल्याचे सांगितले. विशाल याच्या तोंडावर जोरात मार लागल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विशाल याचा भाऊ प्रथमेश हबीब याने घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर विशालची मोटारसायकल तेथे लावली होती. त्याखाली रक्त सांडलेले दिसून येत होते. तसेच लाकडी बॅटचे तुकडे पडलेले दिसत होते. हे पाहता विशाल हबीब याने प्रेमसंबंधाबाबत जाब विचारल्याने आदित्य उमाप याने मारहाण करुन खुन केल्याचा संशय व्यक्त केला आहे. नांदेड सिटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आदित्य उमाप याचा शोध घेतला जात आहे.

You may have missed