Pune Crime News | पुणे : कुख्यात टिपू पठाण टोळीवर तिसरी मोक्का कारवाई ! टिप्याच्या साथीदाराच्या काळेपडळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Crime News | हॉटेल चालकाला धमकावून मी सांगेन त्या दुकानातून मटण खरेदी करायचे व दरमहा ५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणात टिपू पठाण व त्याच्या टोळीवर तिसर्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाणच्या फरारी असलेल्या साथीदाराला जेरबंद केले.
फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख Faizan alias Pacchis Ramzan alias Kader Shaikh (वय २१, रा. सय्यदनगर, मोहंमदवाडी) असे अटक केलेल्या साथीदाराचे नाव आहे.
रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण व त्याच्या टोळीवर जागा बळकावुन खंडणी उकळण्याच्या २ गुन्ह्यात यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. या मोक्का प्रकरणात वेळेत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल न केल्याने न्यायालयाने टिपू पठाण व त्याच्या साथीदारांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर काळेपडळ पोलीस ठाण्यात टिपू पठाण व त्याच्या टोळीविरुद्ध १६ फेब्रुवारी २०२६ रोजी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. टिपू पठाण व त्याच्या ७ साथीदारांनी सय्यदनगरमधील ख्यॉजा मंजिल येथील कार्यालयात हॉटेल मालकाला बोलावून माझ्या भागीदारीतील मटन दुकानामधून मटन खरेदी करण्यास सांगून हॉटेल चालू ठेवायचे असेल तर त्याला दरमहा ५ हजार रुपये खंडणी देण्याची मागणी करुन खंडणी उकळली होती. या गुन्हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलमाचा (मोक्का) अंर्तभाव करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील फरार आरोपी फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख हा सय्यदनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाने सापळा लावून त्याला पकडले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे, दादासो नाळे, काळभोर, लाहिगुडे, परशुराम पिसे, अमोल फडतरे, सय्यद, पोलीस अंमलदार शाहीद शेख, विशाल ठोंबरे, काळे, अतुल पंधरकर, तांबोळी, शिंदे, बेडीस्कर, जगदाळे, परदेशी यांनी केली आहे.
