Gas Shortage In Pune | गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक ठिकाणी तातडीने पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याची क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून मागणी

Gas Shortage In Pune | In the backdrop of gas shortage, Creative Foundation President Sandeep Khardekar demands immediate supply of gas through pipeline to essential places

पुणे : Gas Shortage In Pune | राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांना तातडीने गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठा सुरू करावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कडे केली आहे.

याबाबत त्यांनी एमएनजीएलच्या कमर्शियल विभागाचे व्यवस्थापक प्रतीक जैन यांना निवेदन देत काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या आहेत. सध्या व्यवसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालये, मनोरुग्णालये, शालेय विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देणारी बचत गट केंद्रे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि दिव्यांग केंद्रे यांसारख्या अत्यावश्यक ठिकाणी तातडीने गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठा उपलब्ध करून दिल्यास मोठा दिलासा मिळू शकतो.

यासाठी पुणे महापालिकेच्या पथ विभाग आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून खोदाईची परवानगी तातडीने मिळवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच ज्या भागांमध्ये आधीच एमएनजीएलची गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे, त्या भागातील व्यवसायिक ग्राहकांना युद्धपातळीवर कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. उदाहरणार्थ, म्हात्रे पूल ते राजाराम पूल मार्गावर हार्वेस्ट क्लबपर्यंत पाईपलाईन उपलब्ध आहे, त्यामुळे त्या परिसरातील मंगल कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांना तातडीने कनेक्शन देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय, कोणकोणत्या भागात त्वरित गॅस कनेक्शन उपलब्ध करून देता येईल याबाबत एमएनजीएलने अधिकृत माहिती जाहीर करावी, जेणेकरून संबंधित नागरिक थेट संपर्क साधून कनेक्शन घेऊ शकतील, असेही खर्डेकर यांनी नमूद केले आहे.

सध्याच्या परिस्थितीत गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमएनजीएलने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

You may have missed