Pune Crime News | मंहमदवाडी येथील 300 कोटींच्या जमिनीच्या विकसन करारात 37 कोटींची फसवणुक केल्याप्रकरणी शिवसेनेचे नाना भानगिरे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | महंमदवाडी येथील सुमारे ३०० कोटींचे बाजारमुल्य असलेल्या जमिनीच्या विकसन करारात तब्बल ३७ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोयल, पटेल आणि ठकवाणी या भागीदारी संस्थेचे संचालक तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भागगिरे, सिद्धांत भानगिरे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

याबाबत बांधकाम व्यावसायिक विश्वजित सुभाष झंबर (वय ५६, रा. मार्वल ऑरम, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गोयल, पटेल आणि ठकवाणी डेव्हलपर्सचे (Goyal, Patel and Thakwani Developers) भागीदार राजेंद्र सिताराम गोयल (Rajendra Sitaram Goyal), जयेश पुरुषोत्तम पटेल (Jayesh Purushottam Patel), विपुल वल्लभ पटेल (Vipul Vallabh Patel), पुनम रूफिंग प्रा. लि. (Punam Roofing Pvt Ltd) चे संचालक वल्लभभाई पटेल, सत्येन वल्लभ पटेल (Satyen Vallabh Patel), जिग्नेश वल्लभ पटेल (Jignesh Vallabh Patel), प्रमोद वसंत भानगिरे (Pramod Vasant Bhangire), सिद्धांत भागनिरे (Siddhant Bhaganire)अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार मोहम्मदवाडी व कोरेगाव पार्क येथील ज्वेल टॉवर्स येथे २०११ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल, पटेल आणि ठकवाणी डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेचे भागीदारांनी फिर्यादी यांना सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष दाखवून मोहम्मदवाडी येथील एकूण २० एकर विकसन करारनाम्याप्रमाणे तसेच ८.५८ एकर जमीन समजुतीच्या करारनाम्याप्रमाणे एकूण २२ कोटी रुपये स्वीकारले आहेत. फिर्यादी यांना या प्रकल्पाकरीता आतापर्यंत १५ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडले आहे. फिर्यादी यांना जमिनीचे टायटल क्लियर करुन दिले नाही़ व एस्क्रो करारनामा करुन न देता फसवणुक करण्याच्या उद्देशाने विकसनामध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच १२ गुंठे जमीन फिर्यादी यांच्या संमतीविना परस्पर प्रमोदनाना भानगिरे व इतरांना विक्री केली. फिर्यादी दिलेली २२ कोटी रुपये परत न करता एकूण ३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. जानेवारी २०२६ मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक पूर्व जामीन मिळावा, यासाठी वल्लभ लालजी पटेल व इतर ७ जणांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात या जमिनीची परस्पर विक्री आणि थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करण्यात आला आहे. फिर्यादीसोबतच अधिकृत करार अस्तित्वात असतानाही आरोपींनी सर्व्हे नं. १८/१/१ मधील १२ गुंठे जमीन परस्पर नाना भागगिरे यांना विकली. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी कोणताही मोबदला घेतला गेला नव्हता. केवळ फिर्यादी यांचा हक्क डावलण्यासाठी आणि थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी हा व्यवहार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर या व्यवहाराला कायदेशीर दाखविण्यासाठी बर्‍याच वर्षानंतर आरोपींनी प्रमोद भागगिरे यांच्याकडून २८ डिसेंबर २०२५ रोजी ९६ लाख रुपये स्वीकारले आहे. यावरुन त्यांचा गुन्हेगारी हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रमोद भानगिरे याने खरेदी खत करतेवेळी पैसे दिलेले नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारी कटामध्ये प्रमोद नाना भानगिरे यांचाही समावेश तपासात निष्पन्न झालेले आहे. २०१२ मध्ये फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी २२ कोटी रुपये घेऊन त्यांची विल्हेवाट लावल्याचे तपासामध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. ज्या जागेचे सध्या बाजारमुल्य ३०० कोटी रुपये इतके आहे. त्या जमिनीचे मालकी हक्कात त्यांनी त्रयस्थ पक्षाचे अधिकार तयार केले आहेत. हा सर्व प्रकार हा यु एल सी चा खोटा आदेश तयार करुन केलेले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्यामध्ये आरोपींकडे पोलीस कोठडीमध्ये सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती अर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष डांगे यांनी केली आहे.

You may have missed