Pune Crime News | हुंड्यासाठी होणार्‍या छळाने आणखी एका ‘वैष्णवी’ने संपविले आपले जीवन; 20 लाखांसाठी विवाहितेचा छळ, आयटी इंजिनिअर पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Another 'Vaishnavi' ends his life due to harassment for dawory; Married woman harassed for 20 lakhs, case registered against four including IT engineer husband

पुणे : Pune Crime News | आयटी इंजिनिअर मुलाचे स्थळ आल्याने मुलीच्या वडिलांनी जमीन विकुन आपल्या मुलीचे थाटामाटात लग्न लावून दिले होते. कारसाठी ५ लाख रुपये दिले. तरीही घराच्या इंटेरियरसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपविले. लग्नानंतर वर्षभराच्या आतच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. लोणीकंद पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी यशवंत लाटे (वय २२, रा. बकोरी रोड, लोणीकंद) असे विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (वय ४८, रा. बीड) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती यशवंत शिवनाथ लाटे Yashwant Shivnath Latte (वय २८), सासु सखुबाई शिवनाथ लाटे Sakhubai Shivnath Latte (वय ५०), सासरा शिवनाथ महादेव लाटे Shivnath Mahadev Latte  (वय ५५), दीर सुरज शिवनाथ लाटे Suraj Shivnath Latte (सर्व रा. गोकुळ पार्क फेज २, बकोरी रोड, लोणीकंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत हा आय टी इंजिनियर आहे. दोन्ही कुंटुब हे बीडमधील राहणारे आहे. यशवंत आणि वैष्णवी यांचा विवाह ७ मे २०२५ रोजी बीड जिल्ह्यात झाला होता. लग्नापूर्वी जामकर कुटुंबियांनी लाटे कुटुंबाला फर्निचरसाठी २ लाख रुपये दिले होते. त्यानंतर जमीन विकून वैष्णवीचे लग्न लावून दिले. सासरी आल्यानंतर वैष्णवीचा छळ सुरु झाला. कारसाठी ५ लाख रुपये माहेरहून आण, अशी मागणी होऊ लागली. वैष्णवीची आई व मोठ्या बहिणीने ५ लाख रुपये लाटे कुटुंबाला दिले. त्यानंतर तरी  सासरी वैष्णवीला चांगली वागणूक मिळेल, असे त्यांना वाटत होते. काही दिवसांनंतर वैष्णवीचा पुन्हा छळ सुरु झाला. घराच्या इंटेरियरसाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये, असे सांगून तिचा छळ सुरु झाला. पैसे आणले नाही तर मी दुसरे लग्न करेल, अशी यशवंत लाटे याने वैष्णवीला धमकी दिली. सासू -सासरे व दीरही तिला धमकावत होते. या सर्व छळाला कंटाळून वैष्णवी हिने शनिवारी १४ मार्च रोजी सकाळी बेडरुममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले. या घटनेनंतर लाटे कुटुंबीय आपल्या गावी पळून गेले आहेत.  त्यांना ताब्यात घेण्यासाठी  लोणीकंद  पोलीस पथक पाठविले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.

You may have missed