Edible Oil Price Hike | इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता थेट स्वयंपाकघरात; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ
मुंबई : Edible Oil Price Hike | जागतिक राजकारणातील इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी तणावाचे चटके आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागले आहेत. पश्चिम आशियातील या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील खाद्यतेलाच्या बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या अवघ्या दोन आठवड्यांत खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर १३ ते १५ रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराण-इस्रायल युद्धामुळे ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जहाजांचे वाहतूक भाडे आणि विमा खर्च वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम भारतात आयात होणाऱ्या सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमतींवर झाला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत १४० ते १४५ रुपयांच्या दरम्यान मिळणारे सूर्यफूल तेल आता १५५ ते १७३ रुपयांच्या घरात पोहोचले आहे. तसेच सोयाबीन तेलाचे दरही १३५ रुपयांवरून १५५ रुपयांपर्यंत वधारले आहेत. केवळ खाद्यतेलच नव्हे, तर वनस्पती तूप आणि पूजेच्या तेलातही लिटरमागे १० रुपयांची वाढ झाली आहे.
या दरवाढीचा दुहेरी फटका बसत असून, हॉटेल व्यावसायिकांनीही पदार्थांचे भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. फरसाण, नूडल्स, शेव आणि इतर तळलेल्या पदार्थांच्या किमतीत किलोमागे ५ ते ७ रुपयांची वाढ झाली आहे. ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर ही महागाई वाढल्याने मिठाई आणि फराळाचे पदार्थही महागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. देशांतर्गत पातळीवर यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट हेदेखील या दरवाढीमागचे एक स्थानिक कारण मानले जात आहे.
एकूणच जागतिक स्तरावरील या अस्थिरतेमुळे आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युद्ध थांबले नाही तर आयातीवर अधिक परिणाम होऊन सर्वसामान्यांच्या ताटातील फोडणी अधिकच महाग होणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
