Pune ZP President | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे; उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील
पुणे : Pune ZP President | पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची आज निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्व असलेल्या या जिल्हा परिषदेत अध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर अध्यक्षपद दौंड तालुक्याच्या वाट्याला गेले असून वीरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्याचे विवेक वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या निवडीची औपचारिकता पूर्ण होणे बाकी आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. निवडणूक प्रचारादरम्यान घडलेल्या घटनांनंतरही पक्षाने जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील काही उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविल्याने, त्यांनाही संधी मिळणार का याबाबत उत्सुकता होती.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, गटनेतेपद आणि अध्यक्षपद वेगळे असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आल्याने ढोले यांना अध्यक्षपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.
