Dycm Eknath Shinde | ‘तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष’; उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
नवी दिल्ली : Dycm Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत खासदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान बोलावलेल्या या बैठकीत खासदारांच्या कामगिरीवरून शिंदे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, असेही शिंदेंनी या खासदारांना सुनावले.
बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”तुम्ही दिल्लीत असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष आहे. तुमच्या सगळ्यांच्या कामाच विश्लेषण होत आहे. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा. पक्षाचे प्रतिनिधित्व सभागृहात दिसण्यासाठी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो, तेच सर्वांना लागू होणार आहे.”
एककीडे उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांवर संतापलेले असताना, खासदार श्रीकांत शिंदे यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पक्षाची ध्येयधोरणे आणि केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मिळणारा निधी यावर खासदारांनी संसदेत अधिक प्रभावीपणे बोलावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, खासदारांमधील अंतर्गत स्पर्धा आणि जागावाटपावरून असलेली धास्ती या बैठकीत स्पष्टपणे जाणवत होती.
