Pune PMC News | पुण्यात अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; प्रशासनाचे कौतुक, पुढील कठोर उपायांची क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून मागणी

Pune PMC News | Anti-encroachment crackdown in Pune; Administration praised, Creative Foundation President Sandeep Khardekar demands further strict measures

पुणे : Pune PMC News |  महानगरपालिकेकडून प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना परिसरातील हैप्पी कॉलोनी येथे अतिक्रमणविरोधी धडक कारवाई करण्यात आली. फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन, पदपथ तसेच रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर जोरदार कारवाई करत परिसर मोकळा करण्यात आला.

या कारवाईबद्दल मनपा आयुक्त नवलकिशोर राम, उपायुक्त सोमनाथ बनकर तसेच प्रत्यक्ष कारवाई करणारे प्रभारी अतिक्रमण निरीक्षक मंदार करंजे आणि त्यांच्या टीमचे नागरिकांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशीच सातत्यपूर्ण कारवाई संपूर्ण शहरात होण्याची गरज व्यक्त केली.

खर्डेकर यांनी पुढे सांगितले की, ही अतिक्रमणे पुन्हा उभी राहू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. या कारवाईला स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक पुनीत जोशी, सुनील पांडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि ऍड. मिताली सावळेकर यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासासाठी मांडलेल्या स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त शहराच्या संकल्पनेचा उल्लेख करत, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी मनपा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन खर्डेकर यांनी केले. “आपलं पुणं” हे सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

पुणेकरांच्या अपेक्षा आणि भावनांचा आदर राखत सर्व लोकप्रतिनिधी या दिशेने काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

You may have missed