Pune Crime News | बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक; प्रतिक काबरा, रोहित काबरा, राजेश काबरा यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | बाटलीबंद पाणी व्यवसायात जादा नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास लावून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुणवाल सिगल सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिक काबरा, रोहीत राजेश काबरा Rohit Rajesh Kabra , राजेश सत्यनारायण काबरा Rajesh Satyanarayan Kabra (सर्व रा. युनिका हौसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कदमवाक वस्ती येथील ए पी ब्रेव्हरेजेस या कंपनीत डिसेंबर २०२४ ते ऑक्टोंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मगर फ्युल स्टेशन या नावाने पेट्रोल पंप आहे व त्यांची महाराष्ट्र स्कॉश अॅकडमी उंड्री येथे आहे. प्रतिक काबरा याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. ते ९ पीएम या नावाने २०० मिली, ५०० मिली व १ लिटर पाण्याची बॉटल विक्री करत असल्याचे सांगितले. पाण्याच्या व्यवसायामध्ये ४० ते ५० टक्के मार्जीन आहे, असे सांगून त्यात गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पाणी बॉटल को पॅकेजिंगचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी त्यांनी प्रतिक काबरा याला ३ लाख रुपये दिले. त्याचा भाऊ रोहित ट्रान्सपोर्टेशनचे काम तसेच वडिल तेथील प्लॉंटचे मॅनेजमेंट व मेन्टनन्सचे काम पहात होते. २ महिने हे काम केल्यावर त्यांनी आपण स्वत:चा प्लान्ट सुरु करु असे सांगितले. त्यावर लाहोटी यांनी मला यात लक्ष देता येणार नाही, असे सांगितले. त्यावर तुम्ही फक्त गुंतवणुकीसाठी फंड पुरवा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यात भागीदारी करार झाला.
व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांच्याकडून एक कोटी ७८ लाख रुपये ७५ हजार रुपये घेण्यात आले. जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बाटली बंद पाणी विक्रीमध्ये ६० लाख ६७ हजार १९२ रुपयांचा व्यावसाय केला. त्यातील ५ लाख १९ हजार २५६ रुपये फिर्यादी यांना दिले. उर्वरीत ५५ लाख ४८ हजार ९३६ रुपये आरोपींनी स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेतले. याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर त्यांनी मला तुमच्या बरोबर व्यवसाय करायचा नाही, असे सांगून गुंतवणूक केलेले पैसे परत करुन पार्टनरशिप रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी लाहोटी यांच्या गुंतवणुकीतून खरेदी केलेली यंत्रसाम्रुगी परस्पर विक्री केली. त्यांचे कोणतेही पैसे परत न करता २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.
