Pune Crime News | भाड्याने कार घेऊन बनावट कागदपत्रे तयार करुन ती परस्पर विकून 7 लाखांची केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | सुरुवातीला भाड्याने एर्टिगा कार घेऊन विश्वास संपादन केल्यानंतर पुन्हा भाड्याने कार घेऊन तिची बनावट कागदपत्रे तयार करुन तिची परस्पर दुसर्याला विक्री करुन ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत चैतन्य विजय वाघमोडे (वय २९, रा. घुलेनगर, मांजरी) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मयुर लोंढे (रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ नोव्हेंबर ते १७ मार्च २०२६ पर्यंत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य वाघमोडे यांनी त्यांची एर्टिगा कार भाड्याने देण्यासाठी जस्ट डायलवर रजिस्टर केली आहे. १९ ऑक्टोंबर २०२५ रोजी त्यांना मयुर लोंढे यांचा कॉल आला. त्याने गाडी भाड्याने द्यायची आहे का, असे विचारले. त्यांची गाडी दर दिवशी ३ हजार रुपये भाड्याने देण्याचे ठरले. मयुर लोंढे याने ५ हजार रुपये फोन पे वर पाठविले. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मयुर लोंढे याने पुन्हा भाड्याने गाडी हवी असल्याचे सांगितले. शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे बोलावले.
तेव्हा त्याने ८ ते १० दिवस भाड्याने गाडी लागेल, असे सांगून १० हजार रुपये रोख रक्कम दिली. ठरल्याप्रमाणे तो १२ डिसेंबर २०२५ पर्यंत पैसे पाठवित होता. त्यानंतर त्याने पैसे पाठविणे बंद केले. त्यांचा फोन उचलत नव्हता. त्यांच्या गाडीला जीपीएस सिस्टिम असल्याने त्यांना गाडी तळेगाव राजेवाडी येथे असल्याचे समजले. ते तेथे गेले. तेव्हा लोंढे याने दोन तीन दिवसात पैसे देतो, असे सांगितले. तरीही त्याने पैसे दिले नाहीत. तेव्हा त्यांनी गाडी घेऊन येण्याचा निर्णय घेतला. गाडी टेंभुर्णी येथे असल्याने ते टेंभुर्णीला गेले. तेथे वाद झाल्याने वाघमोडे यांनी ११२ वर कॉल करुन पोलिसांना बोलावले. परंतु, पोलिसांनी मदत केली नाही. परंतु, काही वेळाने गाडीचे लोकेशन बंद असल्याचे दिसून आले.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात लहु ढवळे यांनी चैतन्य वाघमोडे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलावले. तेव्हा सागर ढवळे व मयुर लोंढे यांनी लहु ढवळे यांना ही गाडी विकली असल्याचे सांगितले. त्यांनी नोटरी कागदपत्रे बनवले असल्याचे समजले. ही कागदपत्र पाहिली असता या कागदपत्रावर मयुर लोंढे यांनी फिर्यादी यांच्या जागी त्याचा फोटो व सही केली असल्याचे दिसून आले. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.
