Pune Crime News | पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने मध्यरात्री पेट्रोल टाकून दुचाकी जाळली, वारेज माळवाडी पोलिसांनी पतीला केली अटक
पुणे : Pune Crime News | लग्नानंतर काही दिवस सासरी राहून माहेरी निघून गेलेल्या पत्नीला पती सातत्याने नांदायला ये, म्हणून सांगत होता. तिने नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या दुचाकीवर मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळून टाकली. वारजे माळवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत श्र्वेता विजय काटकर (श्र्वेता राजकुमार सुतार) (वय २७, रा. सदगुरु गॅलेक्सी अपार्टमंट, दांगट इंडस्ट्रियल कमान, शिवणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शिवणेतील सदगुरु गॅलेक्सी अपार्टमेंट येथे २२ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटांनी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्र्वेता काटकर आणि राजकुमार सुतार यांचा विवाह झाला आहे. लग्नानंतर श्र्वेता या तीन महिने सासरी राहिल्या. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने त्या माहेरी निघून आल्या. गेल्या दीड वर्षांपासून ते विभक्त रहात आहेत. राजकुमार सुतार हा तिला सासरी नांदायला ये, म्हणून सांगण्यास त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांनी नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पेट्रोल टाकून श्र्वेता यांची ज्युपीटर मोपेडला काडी लावून पेटवून दिली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी राजकुमार सुतार याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे तपास करीत आहेत.
