Pune Crime News | बोअरवेल घेताना भुमिगत मेट्रोला पडला खड्डा; घरमालक, ठेकेदारावर गुन्हा दाखल, भविष्यात पाणी ट्रॅकवर येऊन मेट्रो सेवा बंद पडू शकते

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  शुक्रवार पेठेत भुमिगत मेट्रोच्या वर घरमालकाने जुनीबोअरवेल जिवंत करत असतना  ६० फुटापेक्षा खोल खोदल्याने मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. या खड्ड्यातून पाणी मेट्रो मार्गावर पडत असल्याने हा प्रकार उघड झाला. मेट्रोचे या प्रकारात अडीच लाखांचे नुकसान झाले असून सध्या मेट्रोने पाण्याची गळती बंद केली आहे. परंतु, संभाव्या धोका अद्यापही टळलेला नाही, हे पाणी ट्रॅकवर येऊन मेट्रो सेवा बंद पडू शकते. अचानक पाणी ट्रॅकवर आल्यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

याप्रकरणी पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुळ घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील खडक पोलीस ठाण्याच्या समोर १४ मार्च रोजी दुपारी पाऊण वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते स्वारगेट ही मेट्रो भूमिगत असून दोन समांतर बोगदे जमिनीखाली साधारण ६० ते १०० फुट खोल खोदलेले आहेत.

मुळ घरमालक धनंजय मोटे यांच्या घराच्या खालुन भूमिगत मेट्रो गेलेली आहे. बोगद्याचे काम करतेवेळी त्या भागातील बाधीत सर्व लोकांना त्या ठिकाणी मेट्रोच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या खोदकाम अगर बोअरवेल घेऊ नयेत, अशा प्रकारच्या सुचना दिलेल्या आहेत़ १४ मार्च रोजी दुपारी ट्रेन ऑपरेटर भूषण प्रदीप बारिंगे यांनी मेट्रोच्या ऑपरेशन कंट्रोल रुममध्ये कळविले की,स्वारगेट ते मंडई मेट्रो स्टेशनचे दरम्यान डाऊन लाईनवर भूमिगत बोगद्याच्या वरील बाजूने पाण्याची गळती होऊन पाणी ट्रॅकवर येत आहे. ही माहिती मिळाल्यावर महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा, स्टेशन मॅनेजर अमेय केसरकर, सुरक्षा निरीक्षक विलास गुजर,  यांनी बोगद्यात पाहणी केली. हे पाणी नक्की कोठून येते, हे समजून येत नसल्याने त्यांनी मेट्रो बोगद्याच्या वर रस्त्याने चालत येऊन पाहणी केली.

खडक पोलीस ठाण्याचे समोर शिवाजी रोडला हिरव्या रंगाची जाळी लावून मेट्रो भूमिगत मार्गाचे वर वाडा पाडून त्या ठिकाणी मोकळया जागेत बोअरवेल खोदल्याचे आढळून आले. चौकशी केल्यावर ठेकेदार जगताप यांनी घरमालक व जमीन मालक यांच्या सांगण्याप्रमाणे बोअरवेल घेतली असल्याचे सांगितले. घरमालक धनंजय मोटे यांचे परवानगीने जुनी बोअरवेल पुन्हा जिवंत केलेली आहे, असे सांगितले. ही बोअरवेल ६० फुट खोल घेतल्याचे सांगितले. ही बोअरवेल मुळेच मेट्रोच्या बोगद्याची सिमेंट रिंग फुटून पाण्याची गळती झाल्याची त्यांची खात्री झाली आहे. या बोअरवेलमुळे मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या (टनेल) सिमेंटच्या रिंगला ६ इंच व्यासाचे छिद्र पडले आहे. त्यामुळे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर १७ मार्च रोजी पाण्याची गळती बंद केली.

परंतु, संभाव्य धोका अद्यापही टळलेला नाही़ हे पाणी ट्रॅकवर येऊन मेट्रो सेवा बंद पडू शकते. अचानक पाणी ट्रॅकवर आल्यास नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

You may have missed